Bhagirath Bhalke, पंढरपूर : विधानसभेची निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी यावेळी सर्वच मतदारसंघात उमेदवारांचे पीक जोमाने डौलू लागले आहे. पंढरपूर- मंगळवेढ्यातही अशीच परिस्थिती असून महाविकास आघाडीकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्यावेळी थोडक्यात पराभूत झालेले भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीचे तिकीट आपल्यालाच मिळेल, असा दावा करीत आज पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील 96 गावांसाठी जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. 'नानांच्या जनसेवेचा रथ चालवेल आपला भगीरथ' असे स्लोगन घेऊन आज पासून या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. 


गावांचे प्रश्न सुटलेले नसून नेमका 3000 कोटी निधी खर्च तरी कसा केला?


भगीरथ भालके यांनी आज पहिल्या दिवशी मंगळवेढा तालुक्यातील ममदाबाद, लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेताना भालके यांनी विद्यमान भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या 3000 कोटीचा विकास निधी आणला या दाव्याची खिल्ली उडवली. कोणत्याच गावांचे प्रश्न सुटलेले नसून नेमका 3000 कोटी निधी खर्च तरी कसा केला असा सवाल भालके यांनी यावेळी केला. 


पंढरपूर तालुक्यातील 17 गावात जन आशीर्वाद यात्रा 


भगीरथ भालके हे आज पासून 26 तारखेपर्यंत  मंगळवेढ्यातील 79 गावांना भेटी देत त्याच ठिकाणी मुक्काम करणार आहेत. यानंतर 27 ते 29 सप्टेंबर या दरम्यान पंढरपूर तालुक्यातील 17 गावात ही जन आशीर्वाद यात्रा जाणार आहे. एका बाजूला विद्यमान आमदार समाधान अवताडे हे लाडकी बहीण आणि आपण केलेल्या विकास कामांची व आणलेल्या योजनांची माहिती देत गावोगावी फिरत आहेत. दरम्यान याचवेळी महाविकास आघाडीकडे दावा करणारे भगीरथ भालके यांनीही जनसंवाद यात्रा सुरू केल्याने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.


महाविकास आघाडीकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात इच्छुकांसाठी संख्या वाढली आहे. एकीकडे भगिरथ भालके इच्छुक आहेत. तर दुसरीकडे प्रशांत पारिचारक महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यातच अभिजीत पाटील माढ्यातून लढणार की पंढरपूर- मंगळवेढ्यात? याबाबत स्पष्टता आलेली नाही. काही दिवसांपूर्वी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंढरपुरात इच्छुकांची संख्या जास्त झाली असली तरी शरद पवार योग्य उमेदवार देतील, असं म्हटलं होतं. 


Ajit Pawar: नियमांचा भंग करत EVM रथाला अजित पवारांनी दाखवला झेंडा? जिल्हाधिकाऱ्यांनी खेड तहसीलदारांकडे मागवला खुलासा