ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गुरुस्थानी असलेले दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या ठाण्यातील आश्रमात काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवणाऱ्यांवर नोटांची उधळण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यावरुन, विरोधकांनी शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यानंतर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला असून ते कृत्य त्यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे. आता, संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना (Shivsena) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी संबंधित नोटा उधळणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार, आता शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने पत्रक जारी करण्यात आले असून दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातील शाखाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या सहीने ते पत्र जारी करण्यात आले आहे.  


ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचं 'आनंदाश्रम' हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसैनिकांचं प्रेरणास्थान आहे. या आनंद आश्रमाच्या एका खोलीत आनंद दिघे यांचं वास्तव्य होते. मात्र, शुक्रवारी आनंद आश्रमात घडलेल्या एका प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे. येथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर चक्क नोटांची उधळण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच, विरोधकांनीही शिंदे गटावर टीका करायला सुरुवात केली होती. याबाबत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिलं होतं. तसेच, पैसे उधळण्याची पद्धत चुकीची असल्याचं त्यानी म्हटलं होतं. मात्र, आता या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.  


ठाण्यात दिनांक 12 स्पटेंबर 2024 रोजी, गणपती विसर्जनाच्या रात्री धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आश्रमामध्ये जे कृत्य घडले, ते अतिशय निंदनिय असून त्यामुळे  पक्षावर चौफेर बाजुने टिका होत आहे. सदर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. तरी या कारणास्तव आपल्याला पदावरून काढुन टाकण्यात येत आहे. तरी सदर घडलेल्या प्रकारबद्दल आपण दोन दिवसात खुलासा करावा, असे पत्रच पैसे उधळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या दोन्हीही शाखाप्रमुख निखिल बुडजडे,नितीन पाटोळे यांच्यावर पक्षातर्फे कारवाई करण्यात आलेली आहेत. ठाणे जिल्हाप्रमुख व शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी पक्षातर्फे कारवाई केली आहे.


लुटीचा पैसा तिथे ठेवला जातो का? - राऊत


याप्रकरणी संजय राऊत म्हणाले की, ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत विचलित करणारे आहेत. व्हिडिओ पाहून आम्ही अस्वस्थ झालो. त्या वास्तूमध्ये आम्ही धिंगाणा पाहिला. लुटीचा पैसे तिथे ठेवला जातो का? एक हंटर तिथे लावण्यात आले आहे. आनंद दिघे असते तर तो हंटर काढून लुटीचे पैसे उधळणाऱ्या लोकांना फोडून काढले असते, अशी टीका त्यांनी यावेळी केली.