पुणे : शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील गुन्हेगारी सध्या चव्हाट्यावर आलेला विषय बनला आहे. पुण्यातील हडपसर येथे चक्क आमदाराच्या मामाचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मामा सतिश वाघ (Satish wagh) यांच्या खूनाबद्दल आमदार योगेश टिळेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काल याच जागेवरून अपहरण झालं होतं, अपहरण करून खून अस घडल आहे. पोलिस यंत्रणा काम करत आहेत. लवकरच पोलिस या मागचे कारण शोध घेतील. मला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी फोन केले, सर्वजण माझ्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहेत, असे आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यानी म्हटले. तसेच, पोलीस यंत्रणेवर माझा विश्वास आहे, यात कुठलंही राजकारण न करता ते या घटनेचा तपास करतील, असेही टिळेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.
आमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस यंत्रणा काम करून लवकरच आरोपींचा शोध घेतील. माझी पोलिस यंत्रणा काही वेळात याचा सुगावा लावेल, त्याचं काम सुरू आहे. यात राजकारण न करता पोलीस आपलं काम करतील. सामान्य माणूस असो किंवा आमदारांचा मामा असो शेवटी ही यंत्रणा आहे. सामान्य नागरिक याच्यावर अन्याय झाला तरी राज्य सरकार चांगलं काम करते. मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी फोन केले आहेत, माझ्या कुटुंबीयांच्या मागे सर्वजण खंबीरपणे उभे आहेत, अशा शब्दात पोलिस यंत्रणांकडून वेगाने तपास सुरू असल्याचं आमदार टिळेकर यांनी म्हटलं.
भाजपचे नेते आणि विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादवा वाघ (वय 55 वर्षे) यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. सतीश वाघ (Satish Wagh) यांचा काल (सोमवारी दि. 9) सायंकाळी सातच्या सुमारास उरुळी कांचन येथील शिंदवणे घाटात निर्जनस्थळी मृतदेह आढळला. सकाळी सव्वासहाच्या सुमारास सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, त्याचवेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या एका चारचाकी गाडीतून आलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी सतीश वाघ यांचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर काही तासांमध्येच सतीश वाघ यांचा अपहरणकर्त्यांनी खून केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नेमक्या कोणत्या कारणातून त्यांचा जीव घेण्यात आला, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान या घटनेला 24 तास उलटून देखील अद्याप अपहरणकर्त्यांचा शोध लागला नाही. पोलिसांची वेगवेगळी पथकं तपास करत आहेत.
शेतजमिनीच्या आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने तपास
सतीश वाघ यांची लोणी काळभोर परिसरातील माळीमळा येथे वडिलोपार्जित शेती आहे. ती शेती सतीश वाघ करतात. या शेतातील एक एकराबाबत दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. त्याची सुनावणी सुरू आहे, दाखल फिर्यादीत नमूद केल्यानुसार सतीश वाघ यांनी दहा वर्षांपूर्वी एका व्यक्तीला तीस ते पस्तीस लाख रुपये जमिनीच्या व्यवहारासाठी दिले होते व पैसे परत मिळत नसल्याने वडील (सतीश वाघ) हे वारंवार कॉल करत असल्याचे ओंकार वाघ यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. किंवा या व्यतिरिक्त अन्य कोणतं वैयक्तिक कारण आहे का याचा पोलिस तपास करत आहेत. पुण्यातील या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
नोकरीचा पहिला दिवस अन् घरी परतताना घात झाला, कुर्ल्यातील बस अपघातात आफरिन शाहने जीव गमावला