अहमदनगर: मी ज्या बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार झालो, तेथील लढाई सोपी नव्हती. अगदी सुरुवातीपासून ते प्रमाणपत्र हातात घेईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मला लढा द्यावा लागला. मात्र, आदरणीय शरद पवार साहेब (Sharad Pawar) आणि जनता माझ्यासोबत होती. देशात सर्वात उशीरा बीडचा निकाल लागला. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित हो नही सकता, असे वक्तव्य बीड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी केले. ते सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते.


यावेळी बजरंग सोनवणे यांनी जोरदार शा‍ब्दिक फटकेबाजी केली. मराठवाड्यात आपल्या पक्षाने फक्त एक जागा लढवली होती. ही जागा मी तुमच्या आशीर्वादाने जिंकली. देशाच्या उच्च सभागृहात जाण्याची संधी मला साहेबांनी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. ज्या हिणवलं जायचं, ज्याची लायकी काय, असं विचारलं जायचं, त्याची लायकी बीड जिल्ह्याच्या जनतेने दाखवून दिली. जनतेने प्रत्येकाची लायकी दाखवून दिली आहे. किंबहुना महाराष्ट्रातील जनतेने ज्याची-त्याची लायकी दाखवून दिली आहे, असे बजरंग बप्पांनी म्हटले.


लोकसभा निवडणुकीत 80 टक्के स्ट्राईक रेट असणारा देशातील एकमेव राजकीय पक्ष: बजरंग सोनवणे


आज आपल्या पक्षाच्या इतिहासात खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. आज पक्षाने आम्हा सर्वांचा सत्कार केला. पण मी विनंती करतो की, आपली लढाई याठिकाणी थांबत नाही, इथून आपल्या खऱ्या लढाईला सुरुवात होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 80 टक्के निकाल लागणारा देशातील एकमेव पक्ष आहे. साताऱ्यात शिंदे साहेबांचा निसटता पराभव झाला. तरीही आपले 8 उमेदवार निवडून आले म्हणजे 80 टक्के रिझल्ट पक्षाच्या बाजूने लागला. या निवडणुकीने आणि महाराष्ट्रातील जनतेने देशाचा खरा नेता कोण? हे दाखवून दिले आहे. यासाठी कार्यकर्ते आणि मतदारांचे मी आभार मानतो, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले.


बजरंग बप्पांकडून निलेश लंकेंचं कौतुक


अहिल्यानगरच्या जनतेने निलेश लंके यांना निवडून दिले. एवढ्या मोठ्या लोकांना तुम्ही पराभवाचं पाणी पाजलं, त्यासाठी मी जनतेसमोर नतमस्तक होतो. एवढ्या मोठ्या लढाया जिंकताना पवार साहेबांचे आशीर्वाद आणि तुमची साथ मिळाली. याच बळावर पक्षाने एवढे मोठे यश मिळवले, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले. आगामी काळात आपल्याला विधानसभा निवडणूक लढायची आहे. पवार साहेबांना आम्हा 8 खासदारांना जबाबदारी  द्यावी आणि त्याचा रिझल्ट घ्यावा. त्यांनी आम्हाला किती मतदारसंघ निवडून आणायचे आहेत, ते सांगावे. शरद पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष जी जबाबदारी देतील ती पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन. मराठवाड्यात आपल्या पक्षाचे सर्वाधिक खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करे, असे बजरंग सोनवणे यांनी सांगितले. 


आणखी वाचा


Video : बजरंग सोनवणेंनी मुंडेंच्या गडाला सुरुंग लावला अन् जयंत पाटलांनी स्वत:चा फेटा भर स्टेजवर बप्पांच्या डोक्यावर चढवला