Beed: राज्यात सध्या विधानसभा निवडणूकांचे वेध लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बीडमध्ये दाखल होण्यापूर्वीच महायुतीतील धुसफुस समोर आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाच्या अनिल जगतापांनी दावा केल्यानंतर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनीदेखील याच विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने महायुतीत आतापासूनच जागावाटपाची रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे.

  


राज्यभरात लोकसभा निवडणूकांनंतर विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जागांसाठी महायुतीत उमेदवारांमध्ये पेच दिसून येतोय. अनेक जण युतीतल्या युतीत या पक्षातून त्या पक्षात उडी मारताना दिसत असून काहींकडून एकाच विधानसभा मतदारसंघांसाठी दावा करण्यात येतोय. असेच चित्र सध्या बीड विधानसभेत दिसण्याची शक्यता दिसतेय.


महायुतीत नवा ट्विस्ट, विधानसभेसाठी आव्हान


बीड विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट आला आहे. 1990 पासून बीड विधानसभेची जागा ही युतीतून शिवसेनेकडे आहे. यावरूनच आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप या जागेवर दावा करतायत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे वर्चस्व या जागेवर आहे. आणि आता अजित पवार गटाकडे घड्याळीचे चिन्ह आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून बीड विधानसभेवर धावा केला जातोय. दोन्ही गटाच्या पक्षप्रमुखांकडून हा पेच सोडवण्याचं आव्हान असणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यात्रा, मेळावे आणि जाहीर सभांचा धडाका लावला आहे. यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच मुख्य लढत असणार आहे. 


शिंदे गट की अजीत पवार गट?


शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी तयारी सुरू केली असून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितले आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर देखील कामाला लागले असून बीड विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या दोघांकडूनही या जागेवर दावे केले जात आहेत. बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी आपली भूमिका आज स्पष्ट केली आहे


हेही वाचा:


महिला सरपंचाकडून आत्मदहनाचा प्रयत्न,बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ओतलं पेट्रोल