बारामती: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. या मतदारसंघातून मविआच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात महायुतीकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना रिंगणात उतरवले जाईल, अशी चर्चा आहे. महायुतीकडून अद्याप सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये सुनेत्रा पवार बारामतीमध्ये (Baramati Loksabha) जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे बारामतीमधून सुनेत्रा पवार यांची लोकसभा उमेदवारी जाहीर होणे, ही निव्वळ औपचारिकता मानली जात आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला अजित पवार यांना बारामतीमधील आपल्या विरोधकांना शांत करण्यात अद्याप यश आलेले नाही. शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी नुकतेच अजित पवार यांच्याविरोधात उघडपणे दंड थोपटले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती जिंकणे तितकेसे सोपे नसेल, हे स्पष्ट झाले आहे. अशातच मंगळवारी सुनेत्रा पवार यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य पाहता सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्याविषयी नक्की काय विचार करत आहेत, याबाबत नवी शंका उपस्थित झाली आहे. 


बारामतीच्या छत्रपती शिवाजीनगर येथे मंगळवारी महिला ग्रुपच्यावतीने 'होम मिनिस्टर खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटले की, दादांना आणि मला तुमची साथ हवी आहे. तुमची साथ असेल तर मी मोठं पाऊल उचलणार आहे. तुमची साथ आवश्यक आहे, तुम्ही फक्त मला साथ देणं गरजेचं आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. त्यांच्या बोलण्यातील 'तुमची साथ असेल तर मी मोठं पाऊल उचलणार आहे' हे वाक्य आता अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे. सुनेत्रा पवार यांनी असे का म्हटले असावे, याविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीतही विरोध कायम ठेवल्यास बारामतीची जागा जिंकता येणार नाही, अशी शंका अजितदादा गटाला वाटत आहे का? तसे घडल्यास सुनेत्रा पवार यांना बारामतीच्या रिंगणात उतरवून कपाळमोक्ष होऊ शकतो. तो टाळण्यासाठी अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत फेरविचार सुरु आहे का?, अशी कुजबुज आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 


सुनेत्रा पवार महिलांसोबत गाण्यावर ठेका धरतात तेव्हा...


बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्याप्रमाणावर हजेरी लावली होती. यावेळी महिलांनी गाण्यावरती ठेका धरला. त्याला सुनेत्रा पवारांनी साथ दिली. तर सुनेत्रा पवार यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रमजान ईदबद्दल मुस्लिम बांधवानाही शुभेच्छा दिल्या. मी नशीबवान आहे, मला बारामतीकरांच्या घरी जाण्याचा योग आला. बारामती हे नेहमीच मी कुटुंब समजते. बारामतीकरांच्या पाठिंब्यामुळेच याठिकाणी विकास करता आला. बारामतीमध्ये महिला सक्षमीकरणासोबत पुरुषांचेही सक्षमीकरण झाले पाहिजे, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले. 


आणखी वाचा


बारामती लोकसभा मतदारसंघातील विजय हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय असेल; चंद्रशेखर बावनकुळेंचं 'पाॅवर'मय भाकित!