Baramati Loksabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी धरणातील  मुत्राशयाचा उल्लेख केला आणि आमची मान खाली गेली. अजित पवारांनी सकाळचा शपथविधी केला आणि आमची मान खाली गेली. दुपारचा शपथविधी केला आणि आमची मान खाली गेली. आता रात्रीचा कोणता कार्यक्रम दाखवणार आहेत माहित नाही, अशा शब्दात राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. राजेंद्र पवार हे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे वडील आहेत. 


बारामतीच्या विकासात आपला मोठा वाटा असल्याच अजित पवारांनी प्रचारात म्हटलं. अजित पवारांनी केलेल्या या दाव्याला उत्तर देतांना बारामतीच्या विकासात सर्वच पवार कुटुंबाचा वाटा असल्याचं राजेंद्र पवार यांनी सांगितलं. तसेच रोहित पवारांना जरी अटक झाली तरी आपण शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचं राजेंद्र पवारांनी स्पष्ट केलं आहे. 


राजेंद्र पवार नेमकं काय म्हणाले?


अजित पवार असे म्हणतात की, मीच काम केलं तर ते तसे नाही. 1940 पासून माझ्या आजीने या भागात काम केलं. घरात सामाजिक आणि राजकीय वातावरण होते. धरणातील वक्तव्य केले तेव्हा मान खाली गेली, पहाटेचा शपथ विधी झाला, सकाळचा शपथविधी झाला तेव्हा आमची मन खाली गेली. आता रात्रीचा एखादा कार्यक्रम करावा म्हणजे झालं, असं राजेंद्र पवार म्हणाले. 


मिशा ठेवायचा की नाही हा त्यांचा कार्यक्रम- राजेंद्र पवार


मिशा ठेवायचा की नाही त्यांचा कार्यक्रम आहे. अजित पवारांना कधी घरातून विरोध झाला नाही. अजित पवार म्हणतात पावसाळ्यात छत्र्या उगवतात.  त्यांना माहीत नाही आम्ही सगळ्या सीझनमध्ये आम्ही इथेच असतो. अजित पवार बोलतात ते मनाला लागत नाही. त्यांची दमदाटी करणे हा स्वभाव. ते आवाजाचा दुरुपयोग करतात. आज काल धमकावले की उपयोग होतो असे भाजपचे धोरणे तेच त्यांनी केलं. संघर्ष नको म्हणून आम्ही तिकडे लक्ष देत नव्हतो. जिथे आपण काय केलं नाही तर काळजी का करायची?, असं राजेंद्र पवारांनी सांगितलं. 


सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे...कोण बाजी मारणार?


बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. बारामतीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही बारामतीमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीच्यानिमित्ताने शरद पवार यांची राजकीय कारकीर्द  पणाला लागली आहे. अजित पवार यांच्यापाठी भाजपची अजस्त्र यंत्रणा आहे. मात्र, शरद पवार यांचा वैयक्तिक करिष्मा आणि जनसंपर्क बारामतीमध्ये वरचढ ठरू शकतो. त्यामुळे येत्या 4 जूनला काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.