Jalgaon News जळगाव : जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील (Shriram Patil) आणि महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्यामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक तोंडावर आली असतानाच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याचं आता पाहायला मिळत आहे. श्रीराम पाटील यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. 


श्रीराम पाटील म्हणाले की, जनतेने आपल्यासारख्या नवख्या माणसाला चांगला प्रतिसाद दिला आहे. आपल्यावर आणि पक्षावर विश्वास दाखविला आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) मोठे नेते आहे ते अनुभवी आहे. त्यांचा फायदा त्यांच्या पक्षाला होणार असला तरी आपण मोठी मेहनत घेणार आहोत. आजपर्यंत आपण केलेल्या सामाजिक कार्याचा विचार करता जनता आपल्यावर विश्वास ठेवणार असल्याने समोर कितीही मोठा उमेदवार असला तरी लोक आपल्याला साथ देतील, असे त्यांनी म्हटले आहे.  


आम्ही डमी आहोत तर खडसेंना प्रचारात उतरण्याची गरज का भासली?


डमी उमेदवार म्हणून श्रीराम पाटील यांना विरोधक डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर बोलताना श्रीराम पाटील यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. भाऊ तुम्ही मोठे राजकारणी आहात. वडीलधारी आहात. आम्ही तुमचा आदर करतो. तुम्ही तुमच्या पद्धतीत रहा, आमच्यामध्ये पडू नका. आम्ही जर डमी आहोत तर मग आमच्या विरोधात तुम्हाला स्वतःला प्रचारात उतरण्याची आवश्यकता का भासली, असा सवाल श्रीराम पाटील यांनी उपस्थित केला आहे. 


 मी लढणार आणि जिंकणार 


क्लीप क्लीप खेळू नका, कोणाच्या किती क्लीप आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. आपल्याला क्लीपचे राजकारण करायचे नाही तर विकासाचे राजकारण करायचे आहे. मला समाज सेवा करणारा राजकारणी बनायचे आहे. मला मेहनत करून जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. मी लढणार आणि जिंकणार असल्याचंही श्रीराम पाटील यांनी म्हटले आहे. 


आता परिवर्तन होणे महत्वाचे 


राष्ट्रवादी पक्षाला एकनाथ खडसे यांनी फसवल्याचे लोक सांगतात. मी त्या बाबत बोलणार नाही. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) आमच्या सोबत आहे. त्यांनी आपल्याला लीड देणार असल्याचं त्यांनी पक्षाला सांगितले आहे. यंदाच्या निवडणुकीत जनतेने कोणत्याही गोष्टीला बळी पडू नये. आता परिवर्तन होणे महत्वाचे आहे आणि ते घडेल याची खात्री आहे. मात्र आता परिवर्तन नाही झाले तर तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार राहील किंवा नाही हे सांगता येणार नाही. 


लोकप्रतिनिधी कसा असावा हे दाखवून देणार


शिवाय हा परिवार कोणाला मोठा होऊ देणार नाही. त्यामुळे जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घ्यावी.  लोकप्रतिनिधी कसा असावा हे आपण दाखवून देणार आहोत. मात्र त्यासाठी यांना बदल केल्याशिवाय हे दिसणार नसल्याने जनतेने आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन यावेळी श्रीराम पाटील यांनी केले आहे.  


आणखी वाचा 


Eknath Khadse : नाथाभाऊ सुनबाईसाठी मैदानात, भाजप प्रवेशाआधीच रक्षा खडसेंच्या प्रचाराला सुरुवात!