पुणे: देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha Election) राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसतंय. या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) अशी लढत होणार असल्याने प्रत्येक गावाता महत्व प्राप्त झालंय. अशात बारामती लोकसभा मतदारसंघातील शेवटचं गाव समजलं जाणाऱ्या कासारसाईतील नागरिकांना एबीपी माझाला प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत पवार कुटुंबीय कधीही गावात आलं नाही, पण आता त्यांच्या गळ्याशी आलंय, त्यामुळे त्यांना आमच्याकडे यावंच लागेल असं काही गावकऱ्यांनी म्हटलंय. 


बारामती लोकसभेत नणंद विरुद्ध भावजय अशी संभाव्य लढत मानली जात आहे. त्यामुळं यंदा मतदारसंघातील प्रत्येक गावाला महत्व प्राप्त झालंय. आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीय ज्या गावात पोहचले नाहीत, त्या भोर तालुक्यातील कासारसाई या गावात एबीपी माझाची टीम पोहचली.


पवार कुटुंबीय आमच्याकडे आतापर्यंत कधीच फिरकले नाहीत. पण या लोकसभेला त्यांच्या गळाशी आलंय. त्यामुळं यंदा त्यांना आमच्याकडे यावंचं लागेल अशी कोपरखळी मारत पवार कुटुंबीयांवर ओढवलेल्या परिस्थितीवर हे गावकरी अशा पद्धतीनं भाष्य करताना दिसत आहेत.


शेवटचं गाव म्हणून दुर्लक्ष


बारामती मतदारसंघातील कासारसाई हे गाव शेवटचं गाव असल्याने या गावाकडे आतापर्यंत सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचं एका नागरिकाने सांगितलं. आतापर्यंत पवार कुटुंबातील एकही व्यक्ती या गावात आला नाही, पण यावेळी त्यांना यावच लागेल, कारण आता त्यांच्या गळ्याशी आलंय असं एका नागरिकाने म्हटलं. 


शरद पवार टफ जातील 


शरद पवार वरचढ ठरतील की अजित पवार जिंकतील असा प्रश्न विचारल्यानंतर एक मतदार म्हणाला की, आतापर्यंत जे काही केलंय ते शरद पवारांनीच केलंय. त्यामुळे ते अजित पवारांना जड जाईल. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय शरद पवारांनी घेतलेत, अजित पवारांनी पक्ष सोडून जायला नको होता, भाजपसोबत गेलेलं आवडलंन नाही असं एक गावकरी म्हणाला. 


सुनेत्रा पवार बाजी मारणार की सुप्रिया सुळे निवडून येणार असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांमुळे सुप्रिया सुळे यांचं पारडं जड असल्याची प्रतिक्रिया एकाने दिली. 


मोदी सरकार शेतकरी विरोधी 


मोदी सरकार सत्तेत आल्यापासून 300 रुपयांचं खताचं पोतं आता 1600 रुपयांपर्यंत गेल्याचं एका शेतकऱ्याने सांगितलं. त्यामुळे मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, शरद पवारांच्या काळात शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले गेले असंही तो म्हणाला. तर या गावात आणि परिसरात शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने शेतीसाठी जो काम करेल त्याला मतदान करू असं एका शेतकऱ्याने मत व्यक्त केलं. 


सग्राम थोपटे सांगतील ते होणार


अजित पवार हे कार्यक्षम नेते आहेत, पण भोर आणि मुळशी भागाचा विकास हा काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेंनी केलाय. त्यामुळे ते सांगतील तसं आम्ही करणार असं एका व्यक्तीने सांगितलं. संग्राम थोपटेंच्या पाठिंब्यामुळे सुप्रिया सुळे यांची बाजू वरचढ असल्याचं दिसतंय असंही एकाने प्रतिक्रिया दिली.


आमच्या गावात यावं, आम्हाला भेटावं ही भोर तालुक्यातील कासारसाई या शेवटच्या गावातील नागरिकांची अपेक्षा आता पवार कुटुंबातील कोण उमेदवार पूर्ण करतो हे पाहावं लागेल. 


ही बातमी वाचा: 



Sharad Pawas Vs Ajit Pawar : मतदारसंघातलं शेवटचं गाव, Kasarsai मध्ये काय वातावरण? दादा की साहेब?