कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा मुलगा काँग्रेसला (Congress) मतदान करणार हे दुर्दैव, असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती, त्याचा अभिमान बाळगत आहेत. 26 जुलैच्या पुरात बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेवून स्वत: फाईव्ह स्टारमध्ये गेले होते, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत जोरदार भाषण केलं आहे.


बाळासाहेबांचा मुलगा पंजाला मतदान करणार हे दुर्दैव


बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, काँग्रेससोबत जावं लागेल, त्यावेळी माझं दुकान बंद करेन. पण त्याच ठाकरेंचा मुलगा आज पंजाला मतदान करणार आहे. जनाची नाही तरी, मनाची तरी लाज ठेवली पाहिजे होती. उबाठाची आता पूर्ण काँग्रेस झाली आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती, त्याचा अभिमान बाळगत आहेत. 


बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील


बाळासाहेब म्हणाले होते, माझी काँग्रेस कधी होऊ देणार नाही. शिवसेनेची काँग्रेस कधी होऊ देणार नाही, अशी वेळ येईल तेव्हा माझं हे दुकान बंद करेन, असं बाळासाहेब म्हणाले होते आणि आज त्यांचा मुलगा, त्यांचा परिवार पंजाला मतदान करणार आहे. हे या देशाचं, या राज्यांचं दुर्दैव आहे. जनाची नाही, मनाची तरी ठेवली पाहिजे. असं पाऊल उचलल्याने बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील, ज्या गोष्टीचा खेद वाटायला पाहिजे, ते जाहिरपणे सांगतायत. याचा त्यांना अभिमान वाटतो. 


हिंदूह्रदयसम्राट म्हणायला जीभ कचरू लागलीय


खरं म्हणजे त्यांना हिंदू म्हणायची देखील लाज वाटायला लागली आहे. हिंदूह्रदयसम्राट म्हणायला त्यांची जीभ कचरू लागली आहे आणि आता उबाठाची एक काँग्रेस झालेली आहे. म्हणून देशाचा कणखर आणि कतृत्ववान पंतप्रधान आपल्याचा निवडायचा आहे. देशात गरमी झाली म्हणून परदेशात पळणारा नेता आपल्याला पाहिजे की, दररोज 24 तास, 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा पंतप्रधान आपल्याला पाहिजे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधीवरही जोरदार टीका केली आहे.


आईच्या पदराला धरून राजकारण करणारा पंतप्रधान नको


आईच्या मृत्यूचं दु:ख विसरून स्वत:ला देशासाठी वाहून घेणारा आपल्याला पंतप्रधान पाहिजे. आजही आईच्या पदराला धरून राजकारण करणारा पंतप्रधान आपल्याला नको आहे. परदेशात देशाची बदनामी करणारा नको, तर परदेशात देशाचा सन्मान वाढवणारा पंतप्रधान आपल्याला पाहिजे ही आपली मागणी आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका