नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्वप्रथम 20 उमेदवारांची यादी जाहीर करत महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. भाजपची उमेदवारी यादी जाहीर होऊन तब्बल आठवडा उलटला तरी अद्याप महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा काही सुटायला तयार नाही. परंतु, आता लवकरच महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेस पक्षाकडून (Congress) उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. काँग्रेसच्या छाननी समितीची नुकतीच बैठक पार पडली होती. यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहिती आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील दोन महिला नेत्यांची नावे निश्चित केली आहेत. त्यानुसार, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanokar) यांना उमेदवारी दिली जाईल. या जागेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यादेखील इच्छूक होत्या. मात्र, गेल्यावेळी बाळू धानोरकर यांनी मोदी लाटेतही चंद्रपूर मतदारसंघ काँग्रेसला जिंकवून दिला होता. त्यामुळे आता पक्षाने त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाच चंद्रपूरमधून उमेदवारी दिल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून प्रतिभा धानोरकर आणि प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा उमेदवारीची लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असे सांगितले जात आहे.


गेल्या बऱ्याच दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये लोकसभा जागावाटपाची चर्चा सुरु आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करायची की नाही, यावरुन मविआचा बराच वेळ अगोदरच वाया गेला आहे. परंतु, आता वंचितशी युती होणार नाही, हे डोक्यात ठेवून मविआने अंतिम जागावाटप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सध्याच्या माहितीनुसार, मविआने लोकसभेसाठी  22-16-10 हा फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्यानुसार ठाकरे गट 22, काँग्रेस 16 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दहा जागांवर लढण्याची शक्यता आहे. मात्र, चार ते पाच जागांबाबत अद्याप एकमत न झाल्याने मविआतील पक्षांनी अद्याप उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. अशातच सांगली लोकसभेत उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करुन टाकली. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे. सांगलीची जागा काँग्रेसचे विशाल पाटील यांना लढवायची होती. परंतु, आता ठाकरेंनी याठिकाणी आपला उमेदवार जाहीर केल्याने तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा मविआचे नेते कसे सोडवणार, हे आता पाहावे लागेल.


आणखी वाचा


तुमच्यासह किंवा तुमच्याविना! संध्याकाळ 7 वाजेपर्यत निर्णय सांगा, अन्यथा आमचं जागावाटप ठरलंय; मविआचा प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम