अमरावती: अमरावतीमधील सभेच्या मैदानाचा वाद आता तापला असून त्यामुळे प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याचं दिसून आलं. पहिला आम्हाला परवानगी दिली आणि नंतर ती रद्द करून त्याच ठिकाणी अमित शाहांच्या सभेला परवानगी देण्यात आल्यामुळे आमदार बच्चू कडू संतापले. कायदा राखण्याचं काम करणाऱ्या पोलिसांनीच आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. तसेच पोलिसांनी आपल्या गाडीवर भाजपचे झेंडे लावावेत, त्यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं होतंय असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.
पोलिसांसमोरच परवानगीचं पत्र फाडलं
पोलिसांसमोरच बच्चू कडूंनी सभेच्या परवानगीचं पत्र फाडलं. अमित शाहांच्या सुरक्षेचं कारण देऊन आमची सभा रद्द करता, तुम्ही कायद्या बाबत बोलू नका, तुम्ही कायदा चुलीत घातला असा संताप बच्चू कडूंनी व्यक्त केला.
पोलिसांच्याबद्दल सामान्य लोकांमध्ये आदर असताना तुम्ही त्याची किंमत घालवताय असा आरोप बच्चू कडू यांनी केला.
अमरावती येथील सायन्सकोर मैदान बच्चू कडू यांनी 24 तारखेसाठी बुक करून त्याचे पैसे ही भरले. पण याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. अमित शहा यांच्या सभेसाठी पूर्ण जय्यत तयारी सुरू आहे. परवानगी आम्हाला मग सभा अमित शहा यांची कशी असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. याच मैदानाची पाहणी करण्यासाठी बच्चू कडू स्वतः येत असल्याने पोलीसांनी सर्व गेट बंद केले असून बच्चू कडू यांना गेटवरच थांबवतील का हे पाहावं लागेल.
तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात का?
ज्या ठिकाणी आपल्याला सभेसाठी परवानगी देण्यात आली होती, त्याची कागदपत्रेही असताना त्याच मैदानावर आता अमित शाहांच्या सभेला परवानगी कशी काय मिळते असा सवाल बच्चू कडू यांनी पोलिसांना केला. पोलिसांच्या गाड्यांवर भाजपचे झेंडे लावा, तुम्ही भाजपसाठी काम करताय असे खडे बोल बच्चू कडू यांनी पोलिसांना सुनावले.
सुरक्षेच्या कारणास्तव अमित शाह कायदा आणि सुव्यवस्था मोडणार का असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला. पोलिस त्यांचे काम करत नसून भाजप पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असल्याचा आरोप बच्च कडू यांनी केला.
आम्हाला सभेसाठी परवानगी दिली असताना अमित शाहांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आमच्या सभेची परवानगी रद्द करणार का असा सवाल बच्चू कडू यांनी पोलिसांना केला.
तक्रार करून काय फायदा?
सभेला परवानगी असताना आता ऐनवेळी परवानगी नाकारल्यानंतर त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का असा प्रश्न विचारल्यानंतर बच्चू कडू म्हणाले की, काय उपयोग निवडणूक आयोगाकडे तक्रार करून? निवडणूक आयोग त्यांचं काम करतंय का?
आम्हाला अटक करण्याचा भाजपचा प्लॅन
परवानगी असतानाही आता ती रद्द केल्यानंतर आम्ही काहीतरी राडा करावा आणि त्यानंतर आम्हाला अटक करावी असा भाजपचा प्लॅन असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. सुरक्षेचं कारण देऊन आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा डाव भाजपचा आहे. आमचे प्रहारचे उमेदवार दिनेश बूब हे जिंकणार असल्यानेच भाजपने आता हे सर्व सुरू केलं आहे. उद्या आम्ही याच ठिकाणी सभेसाठी लाखांच्या गर्दीने येणार असून जर परवानगी दिली नाही तर उपोषण करणार अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
Bachchu Kadu Amravati VIDEO : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha