बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या आणि मुळच्या बीड जिल्ह्य़ातील असलेल्या सोयल शेख यांना निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह आधीच मिळालेले असताना अपक्ष उमेदवाराला देखील तुतारी हे चिन्ह देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (Sharad Pawar Camp) याला आक्षेप घेतला आहे. मात्र, हा आक्षेप डावलून सोयल शेख (Soyal Shaikh) यांना तुतारी चिन्ह देत असल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Loksabha) मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी जाहीर केले. यानंतर सोयल शेख यांनी आनंद व्यक्त केला असुन बारामतीमधून आपण एक लाख मतांनी निवडून येऊ असा दावा केला आहे.


बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या सोयल शेख यांना मिळाले निवडणूक चिन्ह हे ट्रम्पेट हे आहे. ट्रम्पेट हे ब्रिटीश वाद्य असून बँड वादनात त्याचा समावेश होतो. मात्र, या ट्रम्पेटचे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाकडून तुतारी असे करण्यात आले आहे.


अपक्ष उमेदवाराला दिलेल्या ट्रम्पेट या चिन्हाचा उल्लेख निवडणूक आयोगाने तुतारी असे केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून याला आक्षेप घेण्यात आलाय.  सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबीया यांनी त्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय.  त्याचबरोबर हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकाराबाबत बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वर्ध्यात आम्हाला न्याय मिळाला, पण बारामतीमध्ये वेगळी प्रोसेस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाकडे एक महिन्यापासून फॉलोअप घेतोय. महाराष्ट्रात जिथे आमचा उमेदवार आहे, तिथे हे केलं जातंय, असं सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना सांगितलं.


सुप्रिया सुळे यांच्या कायदेशीर टीमने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात काय म्हटलं आहे?


मी सुप्रिया सदानंद सुळे यांचा निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया आपणाकडे खालील प्रमाणे हरकत घेतो की, आज ३५ बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारांचे चिन्ह वाटपाबाबत आपण बैठक बोलवली होती. सदर बैठकीमधे आपण आम्हास आमच्या पक्षाकरिता राखीव असलेले चिन्ह (तुतारी फुंकणार माणूस) याचे वाटप आम्हास केले. परंतु अपक्ष उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांना अपक्ष उमेदवार करिता चिन्ह तुतारी (trumpet) असे वाटप केले आहे. सदर वाटपास आमची हरकत आहे.

दोन्ही चिन्हाचे नावामधे साधर्म्य असल्याने चिन्ह तुतारी फुंकणार माणूस व तुतारी हे नाव सारखे आहे. राज्यपक्ष म्हणून आम्हास वाटप केलेले चिन्ह (तुतारी फुंकणार माणूस) ह्या नावात तुतारी या नावात साम्य असल्याने मतदार यांचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे मराठी नावातील तुतारी हा शब्द बदलून त्या ठिकाणी दुसरा शब्द निवडणूक आयोगाकडून देण्यात यावा ही विनंती.


आणखी वाचा


सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांनंतर आता रिक्षाचालक शरद पवार बारामतीच्या रिंगणात; उमेदवारी अर्ज भरणार!