जालना : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) निर्णायक बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे यांनी थेट हिंदीमधून भाषण केलं. 'फडणवीस साहाब सब बिगड गये है तुम्हारे उपर, तुम्ही नुसते बडे बडे दिखते, सबके सब गये तुम्हारे पीछे से, मागून पुढे गये,' असे म्हणत जरांगे यांनी हिंदीतून फडणवीसांवर निशाणा साधला. 


यावेळो बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "बँड वाजवणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांनी साखळी उपोषण केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, आमरण उपोषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल, ज्यांनी रॅली काढली त्यांच्यावर गुन्हे दाखल, कुठे पाप फेडणार आहात तुम्ही. एवढी समाजाची नाराजी अंगावर ओढून घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गरज नव्हती. या समाजाने पिढ्यान पिढ्या तुमच्या अंगावर गुलाल टाकला आहे. सगळ्या पक्षातील नेते आपल्या लेकरांसाठी एकत्र आले मग ते सत्ताधारी असो की विरोधक असतील. फडणवीसांची दुसरी एक किमया आहे. यवतमाळचे एसपी महिलांना बसून ठेवत आहे. आंतरवालीच्या बैठकीला येण्यासाठी त्यांना थांबवले जात आहे. पण मराठीत थांबणार नाही, आता तुम्हाला घरी बसवतील असे जरांगे म्हणाले. 


गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून आज गावागावात गोरगरीब लेकरांवर गुन्हे दाखल 


मराठ्यांना वेड्यात काढण्यासाठी फक्त समिती स्थापना करण्यात आले आहे. त्याचा कोणताही फायदा समाजाला झाला नाही. सरकारने गुन्हे मागे घेण्याचे सांगितले होते, उलट गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून आज गावागावात गोरगरीब लेकरांवर गुन्हे दाखल केले जात आहे. मराठ्यांनी आंदोलनापासून लांब जावेत यासाठी गुन्हे दाखल केले जात आहे. फडणवीस यांनी जेवढ्या ताकदीने गुन्हे दाखल केले, तेवढ्या ताकतीने मराठा आज एकत्र आला आहे. तुमचं आमचं शत्रुत्व नव्हतं, असण्याचं कारण देखील नाही. तुम्ही सत्तेचा गैरवापर सुरू केला आणि गोरगरिबांच्या पोरांना गुतवायला सुरुवात केली. त्यामुळे मराठ्यांची लाट उसळली असेही जरांगे म्हणाले.


मुख्यमंत्री मराठा समाजाच्या नजरेतून उतरू लागले...


मुख्यमंत्री यांना आम्ही कमी माया केली नाही?, तरीही तुम्ही आमच्या विरोधात गरळ ओकली, आमचा करेक्ट कार्यक्रम करणार होतात. शिंदे साहेब तुम्ही मराठा समाजाच्या नजरेतून उतरू लागलात. ज्यांना तुम्ही आजवर सावलीत बसवलं त्यांना उन्हात आणा. सगेसोयऱ्याचा शब्द न्यायाधीशांनी काढलेला शब्द आहे. राजकारण माझा मार्ग नाही, मला राजकारणाकडे ओढू नका. राजकारणातले मला कळत नाही, माझा जनआंदोलनावर विश्वास आहे. सगळ्यानी ठरवलंय, प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे, हा निर्णय माझा नाही, समाजाने ठरवले आहे. जास्त फॉर्म भरले तर आपणच अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


पाटील पाटील पाटील....; मनोज जरांगे भाषणाला उठताच जोरदार घोषणाबाजी; आंतरवालीत भगवं वादळ