Bachchu Kadu On Pravin Darekar : प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रवीण दरेकरांच्या (Pravin Darekar) इशाऱ्यानंतर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही एका मतदार संघापुरते असलो तरी आमची गरज पडते, देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) फोन करावा लागतो, असं म्हणत प्रवीण दरेकरांच्या टीकेनंतर बच्चू कडूंनी जोरदार प्रहार केला आहे. बच्चू कडू यांनी महायुतीतीतल नेत्यांवर टीका केली होती. या टीकेनंतर बच्चू कडू यांनी महायुतीत विसंवाद होईल, असं वक्तव्य करू नका, असा सल्ला भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दिला होता.  


प्रवीण दरेकरांवर बच्चू कडूंचा निशाणा


यानंतर प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, आम्ही एका मतदार संघापुरते आहोत. आम्ही तुमच्या एवढे मोठे होऊ शकत नाही, आम्ही एका मतदार संघापुरते असलो तरी आमची गरज पडते. देवेंद्र फडणवीस यांना फोन करावा लागतो, हे त्यातील महत्त्व आहे. आम्ही सत्तेत राहत असताना सुद्धा मूळ शेतकरी, दिव्यांग हे तत्व घेऊन चालतो. त्यावर जेव्हा-जेव्हा बाधा होते तेव्हा आम्ही बोलतो, त्यामध्ये काही कडू लागत असेल तर, ते पचवून घ्यायची ताकद सगळ्यांनी ठेवली पाहिजे , असंही त्यांनी म्हटलं आहे.


'आम्ही एका मतदार संघापुरते असलो तरी आमची गरज पडते'


आम्ही एका मतदार संघापुरते आहोत, प्रवीण दरेकरजी आम्ही तुमच्यापेक्षा मोठे होऊ शकत नाहीत. आम्ही एका मतदारसंघापुरते मर्यादित असलो तरी, आमची गरज पडते. देवेंद्र फडणवीसांना फोन करावा लागतो, हे त्यातील महत्त्व आहे, हे प्रवीणजींना माहित आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे आम्ही सत्तेत राहत असताना मूळ शेतकरी, मजूर, दिव्यांग ही तत्त्वे घेऊन चालतो. त्याच्यावर बाधा येते तेव्हा आम्ही बोलतो. 


महायुतीतील जागावाटपावर काय म्हणाले बच्चू कडू?


महायुतीतील जागावाटपावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, आम्ही कुठलाही दावा केला नाही, मात्र मान-सन्मान युतीमध्ये पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. यावर चर्चा होत नसेल तर आम्ही 'मी खासदार' हे अभियान आम्ही राबवणार असून प्रत्येक मतदारसंघात 200 ते 300 खासदार एका मतदारसंघात आम्ही उभे करणार आणि परिस्थितीला सामोरं जाणार, असंही त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव नाही, घरकुलाची तफावत आहे. या सगळ्यांसाठी मी खासदार हे अभियान राबवू, असं  बच्चू कडूंनी सांगितलं आहे. 


बच्चू कडूंची ईव्हीएमवर निशाणा


बच्चू कडू यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, माझं मतदान योग्य उमेदवाराला मिळालं का नाही, हे पाहण्याचा मूलभूत अधिकार आहे. तो त्याला भेटला पाहिजे, तो सध्या भेटत नाही. मी मतदान बटन दाबल्यावर माझं मत कुणाला भेटलं हे कळत नसेल तर, लोकशाहीचे पतन आहे आणि राष्ट्राचे पतन आहे. ईव्हीएमसोबत एक बॅलेट त्यांना खाली भेटलं पाहिजे.त्यावर शिक्का असला पाहिजे आणि ते बॅलेट बॉक्समध्ये टाकलं पाहिजे. ईव्हीएममुळे वेळ वाचेल, काही आक्षेप आला तर बॅलेट मोजता येईल. 


'शिवतारेंची इच्छा असेल तर प्रहारमधून उभं करू'


विजय शिवतारे उभे राहत असेल तर आम्ही त्याच्यासोबत राहू त्यांची इच्छा असेल तर त्यांना प्रहारच्या चिन्हावर उभं करू, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील सत्तासंघर्ष जुना आहे. पण काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून लढण्याचे संकेत दिले. एकीकडे महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट सोबत असताना विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवारी जाहिर केल्याने हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.