मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांचा गोळीबारात मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या तीन पैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या धर्मराज कश्यप आणि हरियाणाच्या गुरमैल सिंह या दोघांना वांद्रे पूर्व येथील चिल्ड्रन पार्कमधून अटक केली. तिसरा आरोपी शिवकुमार गौतम अद्याप फरार आहे. आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, गुजरात एटीएसच्या ताब्यात असलेली व्यक्ती मुंबईतल्या एका हत्येची जबाबदारी घेते. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचे सूत्रसंचालन गुजरातमधून होत आहे असे आम्ही म्हणत आहोत. त्याला हे ज्वलंत उदाहरण आहे. मुंबईतून उद्योग पळवायचे, मुंबईतून पैसा पळवायचा, मुंबईतील माणसांना त्रास द्यायचा, मुंबईतील माणसांच्या हत्या करायच्या हे सर्व गुजरातमधून होत आहे. याचं सगळं सूत्रसंचालन गुजरातमध्ये होत आहे. खरं म्हणजे अमित शहा यांचा राजीनामा मागावा असं हे प्रकरण आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर तुमच्या गुजरातच्या तुरुंगातला एक गँगस्टर आमच्या महाराष्ट्रातल्या एका राजकीय नेत्याची हत्या करतो आणि तुम्ही काय करताय? आतापर्यंत त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत मी याबाबत काही सांगणार नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.
अजितदादांनी मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा मागावा
गुंडांची टोळी महाराष्ट्रावर चाल करत आहे. यासंदर्भात अजितदादांनी काहीतरी पाऊल उचलले पाहिजे का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजितदादा पण सिंघम आहेत. तिथे एक फुल, दोन हाफ सिंघम आहेत. अजित पवारांनी त्यांच्या एका सहकाऱ्याची हत्या झाली. त्याच्यावर फक्त निषेध व्यक्त करण्याशिवाय काय केले? खरं म्हणजे अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. या राज्याची कायदा-सुव्यवस्था कोलमडून पडली आहे आणि त्याच मंत्रिमंडळात तुम्ही बसत आहात. त्याच मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. तुम्ही काय करताय? सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटत आहे. कधी कुठून गोळी चालेल आणि कधी कुठून कोयत्याचे हल्ले होतील याचा काही भरोसा नाही. या सगळ्या गुंडांचा वापर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजकारणासाठी करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. तर या तीन लोकांनी खोकेगिरी कमी केली तर बरं होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा