लातूर : औसा नगरपरिषद निवडणुकीत (Ausa Nagar Parishad Election) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवत नगरपरिषदवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं. एकूण 23 जागांपैकी तब्बल 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली असून नगराध्यक्ष पदावरही या गटाचा उमेदवार निवडून आला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख यांनी सुमारे साडेचारशे मतांच्या फरकाने विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांना हा धक्का मानला जातो.
औसा निवडणुकीत भाजपला 5 जागा, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. मागील निवडणुकीत दोन जागा मिळवणाऱ्या काँग्रेसचा यावेळी शून्यावर घसरलेला निकाल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
Ausa Nagar Parishad Election : अभिमन्यू पवार यांना धक्का
औसा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी या निवडणुकीत मोठी ताकद पणाला लावत जोरदार प्रयत्न केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अफसर शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची औसा येथे जाहीर सभा आयोजित करत निवडणुकीला वेगळे वळण दिले आणि भाजपसमोर थेट आव्हान उभे केले.
सत्तेतील भागीदार असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष औसा नगरपरिषद निवडणुकीत आमने-सामने आले होते. दोन्ही पक्षांत जोरदार लढत झाली. मात्र या राजकीय संघर्षात काँग्रेसची प्रचार यंत्रणा आणि प्रमुख नेते कुठेच प्रभावीपणे दिसून आले नाहीत.
Latur Election Result : पाचपैकी चार ठिकाणी भाजप विजयी
लातूर जिल्ह्यामध्ये एकूण पाच नगरपरिषद, नगरपंचायतीपैकी चार ठिकाणी भाजपने विजय मिळवला आहे. तर औसा नगर परिषदेमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.
जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि एक नगर पंचायत निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे निकाल खालीलप्रमाणे,
निलंगा नगर परिषद : संजयराज हलगरकर (भाजप)
उदगीर नगर परिषद : स्वाती हुडे, भाजप (भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युती)
अहमदपूर नगर परिषद : स्वप्नील व्हत्ते (भाजप)
औसा नगर परिषद : परवीन शेख ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
रेणापूर नगर पंचायत : शोभा आकनगिरे ( भाजप)
ही बातमी वाचा: