Ambadas Danve on J P Nadda: भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या 18 लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाच्या 'विजय संकल्प सभांना' सुरुवात झाली. यातच आज औरंगाबाद (Aurangabad ) येथे नड्डा यांची सभा झाली. या सभेत बऱ्याच खुर्च्या रिकाम्या असल्याचा व्हिडीओ ठाकरे गटाचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Ambadas Danve on J P Nadda: 'अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा'
हा व्हिडीओ पोस्ट करताना अंबादास दानवे यांनी रिकाम्या खुर्च्यांवर जे पी नड्डा यांना टोला ही लगावला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, 'अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा.' त्यांनी पुढे लिहिलं आहे की, ''लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे.''
औरंगाबादमधील सभेत लोकांना संबोधित करताना जे पी नड्डा म्हणाले आहेत की, ज्यावेळी लस तयारी झाली, ''त्यावेळी हेच काँग्रेस - सपाचे लोक मोदींवर टीका करीत होते. मोदी लस आहे, कोणीही घेऊ नका. मात्र त्याच टीका करणाऱ्यांना मोदींनी लस दिली. जे लोक टीका करत होते तेच चोरू चोरू मोदींची लस घेऊन आले.'' ते पुढे म्हणाले, ''प्रतिकात्मक परिस्थितीत देश सक्षमपणे उभारला. युक्रेन युद्धात कोणत्याही देशांनी आपल्या देशवासीयांना मदत केली नाही पण मोदींजीनी पुतीन यांना बोलून 30 हजार विद्यार्थ्यांना भारतात आणले.'' दरम्यान, भारतीय जनता पक्षाने 'मिशन 144' अंतर्गत महाराष्ट्रातल्या 18 लोकसभा लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या "विजय संकल्प सभांना " सुरुवात झाली आहे.