Ramdas Athawale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया येत असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 
 
अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. त्यानंतर आपण आतापर्यंत अनेक वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे, आता नवा पर्याय शोधावा असे वाटते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजूरकर यांनीदेखील राजीनामा दिला आहे. 


अशोक चव्हाणांनी रिपब्लिकन पक्षात यावं - रामदास आठवले


याबाबत रामदास आठवले म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला हा त्यांनी चांगला निर्णय घेतला. मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.अशोक चव्हाण यांनी महायुतीमध्ये यावे. तसेच महायुतीमधील माझ्या रिपब्लिकन पक्षात त्यांनी प्रवेश करावा, असे आवाहन मी त्यांना करतो, असे आठवले यांनी म्हटले आहे. 


दोन दिवसांत राजकीय निर्णय घेणार - अशोक चव्हाण


काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करु. मला कुणाची उणीदुणी काढायची नाहीत. पक्ष सोडायचे तसे कोणतेही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचे कारण सांगता येणार नाही, मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.


दिल्लीतील हायकमांड अलर्ट


अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील हायकमांड अलर्ट मोडवर आले आहे. राज्यातील काँग्रेसच्या आमदारांसोबत तातडीने संपर्क करण्याच्या सूचना हायकमांडकडून देण्यात आल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम यांच्याकडून काँग्रेसच्या आमदारांना फोन करण्यात आले आहे. आज मुंबईत राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 


सत्यजीत तांबे अस्वस्थ


सत्यजीत तांबे यांनी एक्स या सोशल माध्यमावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे २२ वर्ष तन, मन, धनाने दिली, त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालो आहे. खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही,असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


भाजपने दबाव टाकला, ईडीची भीती दाखवली, त्यानंतरच अशोक चव्हाणांचा राजीनामा; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप