jitendra Awhad: मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा स्टेशन लगत परिसरात असलेल्या इमारतीवर मध्य रेल्वे विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असून तब्बल 19 इमारतींना नोटीसा धाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे इमारती मधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर इमारत खाली करण्यास सांगिलते आहे. याआधी ही मध्य रेल्वेने मुंब्रासह कळवा कल्याण घाटकोपर विक्रोळी अशा विविध भागातील झोपडपट्टी मधील रहिवाशांना घरी खाली करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या त्यावेळी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी ती कारवाई थांबवली होती. आता पुन्हा रेल्वे रुळांच्या लगत असलेल्या इमारतींना नोटीसा देण्यात आल्यामुळे ही कारवाई थांबली नसल्याचे उघड झाले आहे.
मुसळधार पाऊस सुरु असताना देखील मुंब्र्यातील 19 इमारतीमध्ये राहणाऱ्या शेकडो रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी मध्य रेल्वेने नोटीसा पाठवण्यात आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे या 40 वर्षे जुन्या इमारती असून यापैकी अनेकांकडे जमिनीचे कागदपत्र आणि सातबारा देखील आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वी पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या उद्घाटनासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे ठाण्यात आले होते. त्यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भेट घेत रेल्वे लाईन लगतच्या रहिवाशांचे आधी पुनर्वसन करा, मगच ही जागा रिकामी करा, अशी मागणी केली होती. त्यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी कुमार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सकारात्मकता दर्शविली होती. तसेच जोपर्यंत रहिवाशांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र आता पुन्हा ही कारवाई सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा सुरू केलेल्या कारवाई संदर्भात मध्य रेल्वेचे डीआरएम यांची भेट घेऊन तात्काळ कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे. या इमारती पाडण्याचा प्रयत्न केला तर शेकडो लोकांचे संसार उघड्यावर येतील. त्यामुळे एकही इमारत पाडू देणार नाही. निवारा हा त्यांच्या हक्काचा असून तो हक्क कोणी हिरावून घेणार असेल तर वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून विरोध करू असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
राष्ट्रवादीच्या दहा बड्या भ्रष्ट नेत्यांची नावे केंद्रीय तपास यंत्रणांना देणार, पाच नेत्यांची कागदपत्रेही तयार : रणजितसिंह निंबाळकर
Dahi handi 2022 : दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा