Sanjay Raut Defamation Case: किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी केलेला मानहानीचा आरोप आपल्याला मान्य नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात सांगितलं. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर याप्रकरणी आता रितसर खटला चालवला जाईल. 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला आहे.


ईडी तपास करत असलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांना गुरूवारी कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर करण्याचे आदेश महानगरदंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी आर्थर रॉड कारागृहाला दिले. त्यानंतर राऊत यांना दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून कोर्टापुढे हजर करण्यात आलं. हजर होताच न्यायाधीश मोकाशी यांनी राऊत यांना, "तुम्हाला तुमच्याविरोधातील गुन्हा मान्य आहे का?" अशी विचारणा केली. त्यावर संजय राऊत यांनी आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचं कोर्टाला सांगितले. याची नोंद घेत न्यायालयानं आता या प्रकरणाची सुनावणी 19 सप्टेंबर रोजी ठेवली आहे.


संजय राऊत हे सध्या ईडीच्या केसमध्ये अटकेत असल्यानं ते मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात स्वत: हजर राहू शकले नाहीत. सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी मागील सुनावणीच्या वेळी ते न्यायालयत हजर होऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) द्यावेत, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे केली होती.


काय आहे शौचालय घोटाळा?


मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करुन, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे, त्या जागेची पाहणी वनविभागाने सुरु केली होती. 


संबंधित बातमी: 


Raigad Suspected Boat : रायगडमध्ये सापडलेल्या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती
Sanjay Raut: पत्राचाळ घोटाळा प्रकरण: संजय राऊतांविरोधात ईडीच्या हाती आणखी महत्त्वाचे पुरावे?