Anjali Damaniya On Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची हत्येच्या तपासासाठी 1 जानेवारीला नेमलेली एसआयटी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सात जणांची एसआयटी स्थापन करण्यात आलीय. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेलीच या नव्या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत. आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबाचा आक्षेप होता. या घटनेतील आरोपी एसआयटीतील अधिकाऱ्यांच्या संपर्कातील होते, असाही आरोप देशमुख कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. त्यानंतर संतोष देशमुख हत्येच्या तपासणीसाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. नवीन एसआयटी स्थापन झाल्यानंतर अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया दिली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, आधीचे जी एसआयटी होती. त्यामधले सर्वाधिकारी हे बीड जिल्ह्याचे होते. अशा लोकांकडे ही चौकशी देणे मुळात चुकीचं होतं. सगळे बीडचे पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अत्यंत जवळचे होते. त्यांचे काही फोटो देखील मी ट्विट केले होते. जर आरोपीसोबत पोलिसांचे संबंध असेल तर ते काय चौकशी करणार?, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. मी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा दहा मागण्यापैकी एक मागणी एसआयटीबाबत होती. जिल्हा बाहेरचा आणि चांगला पोलीस अधिकाऱ्यांना या एसआयटीमध्ये घेण्यात यावा अशी मी मागणी केली होती. कारण चौकशी जर योग्य झाली नाही,पुरावे मिळाले नाही,तर चौकशीला काही अर्थ राहणार नाही. एसआयटी तात्काळ बदलायला हवी होती. 25 दिवसांनंतर जर एसआयटीमध्ये बदल करुन नवीन बनवली तर पुरावे नष्ट होतील, असं अंजली दमानिया यांनी सांगितले.
त्या दोन घडामोडींमुळे शंकेची सुई-
वेगवेगळे दोन गुन्हा दाखल करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण वेगळं आहे. तर वाल्मिकी कराड यांच्या खंडणी आरोप प्रकरण वेगळं आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांना ज्या दिवशी भेटले...30 तारखेला संध्याकाळी आणि 31 तारखेला सायंकाळी वाल्मिकी कराडने आत्मसमर्पण केलं. या दोन घडामोडी झाल्यात आणि ज्या पद्धतीने झाल्या त्याने शंकेची सुई नक्कीच आहे. हे मुद्दाम प्रकरण खंडणी आरोप वेगळा दाखवण्यात आला आणि हे मुद्दाम करण्यात आलं आहे. हे दोन्ही प्रकरण वेगवेगळं नसून एकच आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच मला आत्तापर्यंतचा कुठलाही तपास गांभीर्याने होत आहे असं वाटलं नाही. कारण पहिल्याच दिवशी जेव्हा स्कार्पिओ गाडीमध्ये दोन मोबाईल मिळाले होते. मात्र डेटा रिकवरी झाली नव्हती, हे ऐकून मला धक्का बसला होता, मला असं वाटतं प्रत्येक पोलीस अधिकारी ज्यांनी ज्यांनी या केसमध्ये दिरंगाई केली आहे, त्याला सुद्धा आज आरोपी बनवलं पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
वाल्मिक कराडच्या आईचे सकाळपासूनच पोलीस ठाण्यात ठिय्या-
खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या आईने आता न्यायायासाठी परळीतील शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत माझ्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे कराड यांच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.. वाल्मिक कराडला आज केजच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज याची मुदत संपत असल्याने केजच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळपासून परळीत वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई बाबूराव कराड यांच्यासह शेकडोंनी परळी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडत गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली असून परळी शहर पोलीस ठाण्यात महिलांची मोठी गर्दी जमाझाली आहे.