नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी गेल्या 4 दिवसांत प्रचारसभांचा धडाका लावल्याचं दिसून आलं. तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर अजित पवारांनी महायुतीच्या इतर उमेदवारांसाठी प्रचार रॅली केल्या. त्यामध्ये, प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील मावळ व शिरुर लोकसभा (Shirur loksabha) मतदारसंघात जाहीर सभा घेत काही नेत्यांना चांगलाच दम भरला. अजित पवारांच्या या दमबाजीवरुन आता त्यांच्यावर टीका होत आहे. आमदार रोहित पवार आणि सुनिल केदार यांनी अजित पवारांच्या सभेतील भाषणावरुन त्यांच्यावर पलटवार केला होता. आता, समाजसेविका अंजली दमानिया (Anjali Damania)  यांनीही अजित पवारांच्या भाषेवरुन त्यांना चांगलंच सुनावलं आहे. 


मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील सभेदरम्यान, अजित पवारांनी आमदार अशोक पवार आणि खासदार अमोल कोल्हेंना चांगलाच दम भरला. पठ्ठ्या आता तू आमदार कसा होतो, तेच बघतो असे म्हणच शरद पवार गटासोबत असलेल्या अशोक पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर, अहमदनगरमध्ये निलेश लंके तर बीडमध्ये बजरंग सोनवणेंवरही प्रहार केला. अजित पवारांची ही धमकीवजा इशाऱ्याची भाषा पाहून आता त्यांच्यावर टीका होत आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करुनही अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. आता, एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अजित पवारांना ही निवडणूक जड जात असल्याचं म्हटलंय. 


खादा माणूस घाबरला किंवा त्याची लोकप्रियता कमी झाली हे त्याला जेव्हा जाणवतो तेव्हा तो गांगरल्यासारखा वागायला लागतो. आत्ताच्या घटकेला जे आपण बघतो, नरेंद्र मोदी असो किंवा अजित पवार असो, ते दोघे अशा पद्धतीने बोलत आहेत. अजित पवारांकडे जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर रोज वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या ते देत आहेत. 


बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना, अजित पवार आधी म्हणाले, मी जे काम केलं आहे ते काम चालू हवं असेल तर तुम्ही सुनेत्रा पवारला मदत करा. आधी तिथपर्यंत ठीक होता. आता रोज उठून-उठून धमक्या मिळत आहेत, ते निलेश लंके असो अशोक पवार असो, अमोल कोल्हे असो, किंवा बजरंग सोनवणे असो प्रत्येकाला तुला बघून घेतो, तुला धडा शिकवतो ही जी भाषा आहे ती काय आहे?, असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे. तुम्ही स्वतःला काय समजता, तुम्ही राजकारणी आहात की गावगुंड आहात, ही कुठली भाषा आहे, असा सवालही दमानिया यांनी अजित पवारांना विचारला आहे. तसेच, धमकी मिळालेल्या चौघा लोकांनी अजित पवार यांच्या विरोधात एकत्र येऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, असे आवाहनही दमानिया यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना, उमेदवारांना केलं आहे.  


अजित पवारांना निवडणूक जड जाणार


दरम्यान, आता अजित पवारांना जाणवत आहे की, त्यांची जी लोकप्रियता होती, ती आता मावळली आहे. आता, त्यांनाच नाही, तर त्यांच्या उमेदवारांनासुद्धा महाराष्ट्रात येणारी नवीन निवडणूक अतिशय जड जाणार असल्याचंही भाकीतही दमानिया यांनी केलं.