Anil Parab on Ravindra Waikar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या जुन्या विश्वासू सहकाऱ्याला मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काही आठवड्यांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केलेल्या रवींद्र वायकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरु आहे. दरम्यान, रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीच्या चर्चा सुरु असताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही त्यांना उमेदवारी द्याच, तुम्हाला 'खरी शिवसेना' समजेल, असे अनिल परब म्हणाले आहेत. 


अमोल किर्तिकर यांच्याविरोधात रवींद्र वायकर लढणार?


मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गजानन किर्तिकर यांचे सुपूत्र अमोल किर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे अमोल किर्तिकर यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांचे वडिल महायुतीच्या प्रचारात सामील झाले आहेत. त्यामुळे वडिल आपल्याला मुलाविरोधात प्रचार करत असल्याचे चित्र आहे. अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्या मागे सध्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचा ससेमिरा सुरू आहे.  त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. 


इकडचा खडा तिकडं केला म्हणून परिणाम होणार नाही


 "ज्याला कोणाला वाटत असेल इकडचा खडा तिकडं केला तर परिणाम होईल. मोठी झाली ती लोकं गेली. मात्र मोठं करणारे इथेच आहेत", अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर व्यक्त केली होती. दरम्यान, रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असले तरी ते छुप्या पद्धतीने मदत करतील, असे तर्कवितर्क लावले जात आहेत. 


गजानन किर्तिकरांचा पत्ता कट होण्याची शक्यता 


मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गट गजानन किर्तीकर यांना उमेदवारी देईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र, रवींद्र वायकरांचे नाव आता चर्चेत आले आहे. त्यामुळे गजानन किर्तीकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मात्र, रवींद्र वायकर निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जातील, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


 







दिल्लीतून फोन आले की यांची दाढी चराचरा करते, मुलाची उमेदवारीही जाहीर करू शकत नाहीत; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात