मुंबई: उत्तर मुंबईच्या जागेवरून महाविकास आगाडीमध्ये कोणताही वाद नाही, पण जर काँग्रेसने ही जागा लढवण्यास नकार दिला, तर त्या ठिकाणी उमेदवार देण्यास आम्ही सक्षम आहोत असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) म्हणाले. ही जागा जर शिवसेनेकडे आलीच तर विनोद घोसाळकर हेच आमचे उमेदवार असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. 'एबीपी माझा'शी बोलताना अनिल परब यांनी हे वक्तव्य केलं.


उत्तर मुंबईच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा केल्या जातात, या ठिकाणाहून तेजस्विनी घोसाळकर या उमेदवार असतील का असा सवाल अनिल परब यांनी विचारला. त्यावर बोलताना अनिल परब म्हणाले की, उत्तर मुंबईची जागा ही काँग्रेसकडेच असेल. पण त्यांच्याकडे जर उमेदवार नसेल तर आम्ही ही जागा लढवू. त्यावेळी तेजस्विनी घोसाळकर नव्हे तर विनोद घोसाळकर हेच आमचे उमेदवार असतील.


वायकरांना निवडणूक लढवून द्या, ओरिजनल शिवसेना कुणाची हे सांगतो


उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेले रविंद्र वायकर हे वायव्य मुंबईतून अमोल किर्तीकरांच्या विरोधात निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना अनिल परब म्हणाले की, वायकरांनी निवडणूक लढवावीच, मग ओरिजनल शिवसेना कुणाची आहे हे सांगतो. ती गद्दारांची आहे की आमची हे लोक ठरवतील. 


भविष्यात भाजपसोबत जाणार का? 


भविष्यातील राजकारण कुणीही काहीही सांगू शकत नाही, राजकारणात कुठलीही शक्यता कधीही नाकारू शकत नाही असं अनिल परब यांनी सांगितलं. पण आता ज्या पद्धतीचं वातावरण आहे, त्यावरून तर भाजपसोबत एकत्र येऊ असं काही दिसत नाही असं ते म्हणाले. 


राज ठाकरेंची ताकद नाही


उद्धव ठाकरे सोडून गेल्यानंतर ती पोकळी भरण्यासाठी राज ठाकरेंना सोबत घेतलं जातंय, पण त्यांची तेवढी ताकद नसल्याचं अनिल परब म्हणाले. राज ठाकरेंकडे एक-दोन टक्के मतं आहेत, पण भाजपला तीही हवी आहेत. म्हणजे भाजपला यावेळी विजयाची खात्री नाही असं परब म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भविष्यात एकत्र येऊ शकतात का असं विचारल्यावर भविष्याचं काही सांगू शकत नाही असं अनिल परब म्हणाले. 


आशिष शेलार आतून खुश आहेत का?


आशिष शेलार स्वतः आज खूश आहेत का? ज्याची महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याची शक्यता असताना त्यांना मुंबईचा अध्यक्ष बनवलं, त्यांची खदखद काय आहे हे आम्हाला माहिती आहे. आशिष शेलार हे मीडियावर खूश आहेत, आतून नाहीत असा दावा अनिल परब यांनी केला. 


वायकर सोडून गेले तरी त्यांच्यापेक्षा पाच हजार मतं जास्त मिळणार


शिवसेना हा कॅडर बेस पक्ष आहे, त्यामुळे कुणीही सोडून गेलं तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही असा दावा करत अनिल परब म्हणाले की, रविंद्र वायकर आम्हाला सोडून  गेले. पण जेवढी मतं वायकरांना पडली होती त्यापेक्षा पाच हजार मतं आम्हाला जास्त पडतील हे मी आता सांगतो. भाजपमध्ये बाहेरून लोक आणली जातात. 


ठाकरे हे नाव आहे, ठाकरे नाव वापरल्याशिवाय महाराष्ट्रात राजकारण होत नाही हे भाजपला माहिती आहे. एका बाजूने सांगता की शिवसेना संपला, मग रोज टीका का करता? असा सवाल अनिल परब यांनी केला. उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये मोठी सहानुभूती आहे असं सांगितलं जातंय, पण जोपर्यंत मतपेटीतून मतं मिळत नाहीत तोपर्यंत ते लक्षात येणार नाही असंही ते म्हणाले. 


लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर समजेल, त्यानंतर विधानसभेची गणितं तयार होतील असं अनिल परबांनी स्पष्ट केलं. देशात आणि राज्यात आता बेरोजगारी, घरांचा प्रश्न, महागाही हे प्रश्न आहेत. त्यावर लोक नाराज असल्याचं अनिल परब म्हणाले. 


ही बातमी वाचा: