मुंबई: मोदींच्या (Narendra Modi) चेहऱ्यावर लोकसभेचे सर्व उमेदवार निवडून येतात असा दावा भाजपकडून केला जातोय, मग शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेलेल्या खासदारांना तिकीट का मिळत नाही? त्यांना तुम्ही निवडून आणू शकत नाही का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केला. भाजपकडून निगेटिव्ह रिपोर्टचा फार्स केला गेला, त्या माध्यमातून शिंदेंच्या उमेदवारांची कत्तल केल्याचा दावा अनिल परब यांनी केला. 'एबीपी माझा'शी बोलताना अनिल परब यांनी हा दाा केला.
निगेटिव्ह रिपोर्टचा फार्स, शिंदेंच्या उमेदवारांची कत्तल सुरू
भाजपकडून शिंदे गटाच्या उमेदवारांची तिकीटं कापण्यात येत असून त्यांची कत्तल सुरू असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. ते म्हणाले की, मोदींच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढवतो असा दावा भाजपकडून केला जातोय. पण मग शिंदेंचे उमेदवार का बदलले जातात? समजा जर निगेटिव्ह रिपोर्ट आला तरीही चेहरा मोदींचाच असेल. त्यामुळे भाजपने शिंदेंना 13 जागा द्यायलाच हव्या होत्या. कारण त्यावेळीदेखील ते मोदींच्या नावावर निवडून आले असा दावा त्यांनी केला होता.
एका बाजूला भाजपवाले म्हणतात की मोदींच्या चेहऱ्यावर सगळ्यांना निवडून आणतो. मग आताही शिंदेंच्या सर्वाना निवडून आणायला हवं होतं. नगेटिव्ह रिपोर्टच्या नावाखाली तुम्ही उमेदवारी का कापता? निगेटिव्ह रिपोर्टच्या नावाखाली शिंदेंच्या उमेदवारांची कत्तल सुरू आहे. आता लोकसभेत फार छोटा आकडा आहे. तुम्ही 13 जागा राखू शकला नाही, तुमच्या उमेदवारांना उमेदवारी देऊ शकला नाही. भावना गवळी यांनी मोदींना राखी बांधली, पण त्यांचीच उमेदवारी गेली.
भाजपचे मूळचे कार्यकर्ते सतरंज्या उचलतात
भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, त्यांच्या मूळच्या कार्यकर्त्यांना त्यावेळी आसुरी आनंद मिळाला. पण आता तेच मूळचे कार्यकर्ते सतरंज्या उचलताना दिसतात, बाहेरून आलेल्या लोकांसाठी पायघड्या घातल्या जातात अशी टीका अनिल परब यांनी केली.
2014 साली युती कुणी तोडली?
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. त्यावर 2014 साली युती कुणी तोडली असा सवाल अनिल परब यांनी केला. ते म्हणाले की, त्यावेळी तर आम्ही काँग्रेससोबत नव्हतो, त्यावेळीही आम्ही हिंदुत्व सोडलं नव्हतं. फक्त भाजपची ताकद वाढल्याचं त्यांना समजल्यानंतर त्यांनी शिवसेनेला सोडलं. त्यावेळी भाजपने आमचा विश्वासघात केला. त्यामुळे आम्ही 2019 साली भाजपला सोडलं हा आरोप चुकीचा आहे.
सांगलीच्या जागेवर दावा का?
उत्तर मुंबईची जागा जर काँग्रेस लढणार नाही तर ती जागा आम्ही लढू, आमची तयारी आहे असं महत्त्वाचं वक्तव्य अनिल परब यांनी केलं. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून, सांगलीच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. त्यावर बोलताना अनिल परब म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात दोन जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची मागणी होती, त्यामुळे कोल्हापूरची जागा आम्ही काँग्रेसला सोडल्यानंतर आम्ही सांगलीवर दावा केला. सुरूवातीला कार्यकर्ते नाराज होतील, पण नंतर सगळं बरोबर होईल.