Anandrao Adsul on Loksabha Election : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकसाठी (Loksabha Election) मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील नेत्यांकडून महायुतीविरोधात वक्तव्य करण्याची मालिकाच सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी त्यांचा मुलगा अमोर कीर्तिकर निवडणुकीत विजयी होईल, असं म्हटलं होतं. आता आणखी एका नेत्यांने शिंदे गटाला अडचणीत आणणारे वक्तव्य केले आहे. शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul ) हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज होते. दरम्यान, आता मतदान पार पडल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. 


राज्यात महाविकास आघाडीचे वातावरण 


आनंदराव अडसूळ म्हणाले, राज्यात स्पर्धा आहे. हे पहिल्यांदा स्वीकारावं लागेल. मी कोणताही पक्षाला बांधील असलो तरी मी चुकीचं बोललं म्हणून खरं ठरणार नाही आणि खरं बोललो म्हणून खरं ठरणार नाही. राज्यात संघर्ष आहे. फार काही जास्त सांगता येणार नाही, पण एक आहे की, महाविकास आघाडीने बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे. हे मान्य करावे लागेल. गजानन कीर्तिकर यांच्या दाव्याशी मी सहमत आहे. एकूण राज्यातील आणि देशातील वातावरण पाहिले तर महाविकास आघाडीचं वातावरण आहे, हे आपल्याला स्वीकारावं लागेल. विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केली. एकमेकांच्या हातात हात घालून चांगलं काम करत आहेत. विरोधकांच्या एकजूटीला महायुतीला नक्कीच फटका बसेल. 


प्रवीण दरेकरांचा आनंदराव अडसूळांवर हल्लाबोल 


दरम्यान, आनंदराव अडसूळ यांनी महायुतीविरोधात वक्तव्य केल्यानंतर प्रवीण दरेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी आनंदराव अडसूळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. महायुतीत राहून आपल्या विरोधात बोलणे असल्याचे दरेकर यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्ष भाजपासोबत आहे. उमेदवारीवेळी आपण नवनीत राणांना समर्थन दिले. आता निवडणुका झाल्यावर अशा प्रकारचे बोलणे  आपल्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. हे विकृत प्रकारचे वक्तव्य आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले. दरम्यान, आनंदराव अडसूळ यांनी गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्याचेही समर्थन केले आहे. शिशिर शिंदे कोण आहेत? गजाभाऊंनी शिवसेनेसाठी आयुष्य खर्ची केलं. लोकांना मोठी मदत केली आहे. शिशिर शिंदे कोठून आला. मनसेतून इकडे आला. मुलाचे काम करु शकलो नाही याची खंत वाटणे गुन्हा आहे का? असा सवालही अडसूळ यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


गुजरात 26 पैकी 26, कर्नाटक, राजस्थानात 100 टक्के जागा जिंकणार, दरेकरांना विश्वास, महाराष्ट्रातील आकडाही सांगितला!