अमरावती : महायुतीत अमरावतीच्या जागेवरून सध्या धुसफूस चालू आहे. अमरावतीची (Amravati) जागा ही आमचीच आहे, असा दावा भाजपकडून (BJP) केला जातोय. तर दुसरीकडे ही जागा आमचीच असून आम्ही कोणत्याही परिस्थितीत ही जागा लढवणार आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी घेतली आहे. दुसरीकडे अमरावतीच्या विद्यामान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यादेखील या जागेसाठी उत्सूक आहेत. त्यामुळे या जागेच्या निमित्ताने महायुतीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.


आनंदराव अडसूळ काय म्हणाले?


अमरावतीची जागा ही भाजपाचीच आहे. काहीही झालं तरी या जागेवरचा उमेदवार हा भाजपच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवणार, असे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची जागा ही आमचीच आहे, असे ठणकावून सांगितले आहे. जेव्हापासून शिवसेना-भाजप यांच्यात युती झालेली आहे, तेव्हापासून ही जागा शिवसेनेकडेच राहिलेली आहे. याआधीच्या निवडणुकीत मी पराभूत झालो. त्या निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. त्यामुळे ही जागा आमचीच आहे, असा भाजपने दावा करणे चुकीचे आहे, असे अडसूळ म्हणाले. 


अमरावतीवर आमचा दावा कायम असणार


आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या संभाव्य उमेदवारीवरही प्रतिक्रिया दिली. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते नवनीत राणा यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करत आहेत. न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवलेले आहे. त्यामुळे आजही आम्ही या जागेवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत. ही जागा आमची आहे. या जागेवर आमचा दावा कायम असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल, असेही अडसूळ म्हणाले. तसेच मी युती धर्म पाळणाऱ्यांपैकी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


 अमरावतीचा उमेदवार आमच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार- फडणवीस 


दरम्यान, अमरावतीच्या जागेसाठी विद्यमान खासदार नवनीत राणा उत्सूक आहेत. राणा यांचा युवा स्वाभिमान पार्टी हा पक्ष महायुतीचा भाग आहे. त्यामुळे ही जागा मिळावी यासाठी राणा यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. नवनीत राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेक बैठका पार पडल्या आहेत. तर दुसरीकडे काहाही झालं तरी या जागेवर जो उमेदवार असेल तो भाजपाच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे अमरावतीच्या जागेबाबत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.