Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये अजूनही अंतिम निर्णय झाला नाही. अशात परभणीत (Parbhani) महायुतीमधील अजित पवारांची राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) कलगीतुरा पाहायला मिळत आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाची (Parbhani Lok Sabha Constituency) जागा महायुतीत राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. असे असताना परभणीत सत्ताधारी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गटात जोरदार घमासान सुरु आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून थेट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शिंदे गटाने केलेल्या 25 कोटींच्या कामाच्या चौकशीची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून बाबाजानी यांनी 25 वर्षात केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच बाबाजानी आणि त्यांच्या मुलांवर अनेक गुन्हे दाखल असून, रमजानच्या पवित्र महिन्यात बाबाजानी यांच्याकडून गैरकृत्य केले जाण्याची शक्यता असल्याने बाबाजानी दुर्रानी यांना हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाथरी येथे 2023-24 मध्ये वैशिष्ठयपुर्ण योजनेतून 25 कोटींची कामं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती. या कामांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांनी केली आहे. विशेष म्हणजे दुर्रानी यांचा पक्ष आणि शिंदेसेना सोबत सत्तेत एकत्र आहे. असे असतांना त्यांनी केलेल्या मागणीमुळे शिंदेसेना देखील आक्रमक होतांना पाहायल मिळत आहे.
शिंदेसेना आक्रमक...
दुर्रानी यांच्या मागणीनंतर आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. "आम्ही केलेली कामं दर्जेदार असुन, त्याची चौकशी करावी. तसेच मागच्या 25 वर्षात बाबाजानी दुर्रानी यांनी नगर परिषद, पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य समितीच्या माध्यमातून केलेल्या सर्व भ्रष्ट कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नाना टाकळंकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दुर्रानी यांना हद्दपार करा...
पवित्र रमजान महिना सुरु असून, या महिन्यात राष्ट्रवादी अजित दादा गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांच्याकडुन काहीही गैरकृत्य केले जाऊ शकतात. तसेच त्यांच्या मुलांवर अनेक गुन्हे दाखल असून, त्यामुळे त्यांना परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मोठी कोंडी होण्याची शक्यता निर्माण झालीय.
इतर महत्वाच्या बातम्या :
MP List of Marathwada : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू! मराठवाड्यातील 2019 मधील खासदारांची यादी