अमरावतीलोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या (Lok Sabha Election 2024 Phase 2) टप्प्यातील निवडणुकांची रणधुमाळी आज रंगताना दिसत आहे. देशासह राज्यातील आठ मतदारसंघात आज निवडणुकांचे मतदान पार पडत असून यात अमरावती लोकसभा मतदारसंघाचा (Amravati Lok Sabha Election 2024) देखील समावेश आहे. अशातच अमरावती लोकसभा मतदारसंघात अंडरवर्ल्डपासून बड्या बिल्डरांचा पैसा खेळवला जातोय, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur ) यांनी केलाय. अमरावतीमध्ये सध्या धनशक्ती विरूद्ध जनशक्ती असा मुकाबला सुरू आहे. धनशक्तीच्या जोरावर पोलीस-प्रशासन हवं तसं नाचवलं जातंय. तसेच कोट्यवधी रूपये उधळून प्रचारयंत्रणा राबवली गेलीय. परिणामी, आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करून लहान मुलांचा, धार्मिक प्रतिकांचा वापर केला गेलाय. असा दावाही यशोमती ठाकूर यांनी केलाय.  


महाराष्ट्राला पुन्हा आर. आर. पाटील लाभले - यशोमती ठाकूर 


अमरावतीमध्ये जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा प्रचार करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, याही परिस्थितीत केवळ संविधानाच्या रक्षणाकरिता, अमरावतीच्या समृद्ध राजकीय-सामाजिक वारश्याचं जतन करण्याकरिता, काँग्रेसचा उमेदवार जीवाचं रान करत आहे. अपुऱ्या संसाधनामुळे या उमेदवाराचा प्रचार थांबला नाही. तो कमीही पडला नाही. लोकांमध्ये जाऊन मिळून-मिसळून, त्यांच्या सोबत कधी पायी चालले, तर कधी जमीनीवर झोपले, असं करत हा उमेदवार आज मैदानात आहे. माझे बंधू आणि अमरावती लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या रूपाने महाराष्ट्राला पुन्हा एकदा आर. आर. पाटील सापडला, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या. 


संविधानाच्या रक्षणासाठी अमरावतीकरांच्या खांद्यावर जबाबदारी


राजकारणात चांगली माणसं आहेत. ती माणसं पैशाने नाहीत, पण माणुसकीने श्रींमत आहेत. मनाची ही श्रीमंती टिकली पाहिजेत. या महाराष्ट्राने आर. आर. पाटील यांच्यासारखा चारित्र्यसंपन्न नेता पाहिला. राजकारणातील साधेपणाचं दुसरं नाव म्हणजे आर. आर. पाटील असं म्हटलं जायचं. आबा आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांची छबी मला बळवंत वानखेडे मध्ये दिसते. आज जनतेने त्यांची निवडणूक हातात घेतली आहे. या निवडणुकीसाठी लोकं स्वतःच्या खिशातले पैसे टाकून प्रचार केलाय. सध्याच्या काळात जिथे निवडणुका महागड्या होतायत तिथे हे एक आशादायक चित्र महाराष्ट्रात दिसतंय.  संविधानाच्या रक्षणासाठी आणि अमरावतीतील शांतता-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून आज अमरावतीकरांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे, त्यांनी ती पार पाडावी, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या