Amol Kolhe, माजलगाव : " जर निवडणुका लांबणीवर गेल्या तर डोक्याचं केस गळू नयेत यासाठीच्या तेलाचा सर्वांत जास्त बिझनेस मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे होईल. कारण मंत्रालयातील सर्व अधिकारी वैतागले आहेत. तिजोरीमध्ये खडखडाट आहे. आता मंत्रालयातील अधिकारी केस उपटायलेत. कारण सरकारची परिस्थिती आयसीयूमधील पेशंट प्रमाणे झालीये. महायुतीच्या सल्लागारांना विनम्रपणे एवढचं सांगू इच्छितो की महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आहे. आमच्याकडे पाऊस लांबणीवर पडला म्हणून शेतकरी हातपाय गाळून बसत नाही. तो पुन्हा कंबर कसतो, दुबाक पेरणी करतो. निवडणुका लांबणीवर टाकल्या तरी महाराष्ट्रातील शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तेलगाव येथील शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत ते बोलत होते. 


कदाचित महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका पुढ ढकलण्यात येतील


अमोल कोल्हे म्हणाले, निवडणूक आयोगाची 3 वाजता महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात संशय आहे, शंका आहेत. कदाचित महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका पुढ ढकलण्यात येतील. काही तज्ज्ञ सांगतात की, सरकारला कळून चुकलं आहे की, आता जर निवडणुका झाल्या तर महाराष्ट्र सरकार हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर टाकायच्या आहेत.


शेतकरी रुमणं हातात घेतो तेव्हा भल्याभल्या सरकारांची पळता भुई थोडी होते


पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, शेतकरी रुमणं हातात घेतो तेव्हा भल्याभल्या सरकारांची पळता भुई थोडी होते. सरकार सोयाबिना 6 हजार रुपये भाव देणार होतं. त्यासाठी 2014 मध्ये दिंडी काढण्यात आली होती. गळ्यात टाळ घालून बेंबीच्या देठापासून ओरडत जात होते. तेव्हा 6 हजार भाव मागत होते. आज 4 हजार रुपयांनी सोयाबिन घालावं लागतय. प्रत्येक शेतकऱ्याचं 1200 ते 1300 रुपयांचं नुकसान होतं आहे. म्हणजे एकरामागे साडे बावीस हजार रुपयांचं नुकसान होतं आहे. 


खताची बॅग साडेचारशी रुपये होती, आता किती रुपये झाली? हे शेतकरी विसरणार नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, तीच युवकांची परिस्थिती आहे. सरकारमधील अडीच लाख पदं रिक्त आहेत, त्याची भरतीचं होतं नाही. मराठी तरुणांना भरती करुन घेतलं जात नाही. तो पैसा योजनांसाठी फिरवला जातोय, असंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं.