Amit Thackeray On Uddhav Thackeray: मी 2017 मध्ये आजारी असताना सहा नगरसेवक फोडले, जर मागितले असते तर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी असेच देऊन टाकले. कर्म शेवटी कोणालाच चुकत नाही हे यावरून दिसून येतं, तुम्ही आमचे सहा फोडले, नियतीने तुमचे 40 आमदार फोडले, अशी टीका माहीम विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी केली. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित ठाकरे बोलत होते.
मी आजारी होतो तेव्हा मला माहित होतं की, माझे वडील काय आहेत या फोडाफोडीचा त्यांना काही फरक पडणार नव्हता आणि ते पुढे काय करू शकतात हेही मला माहीत होतं. पण त्यावेळी नैतिकता पाळली गेली नाही, आता ते बोलतात की, मी आजारी असताना माझे 40 आमदार फोडले, तेव्हा मी आजारी असताना तुम्ही सहा नगरसेवक फोडले तेव्हा तुम्हाला तुमची चूक दिसली नाही का?, असा सवालही अमित ठाकरेंनी उपस्थित केला.
'मातोश्री'वरुन मिळाल्या मोठ्ठ्या शुभेच्छा- अमित ठाकरे
माहीममधून अमित ठाकरेंना (Amit Thackeray) उमेदवारी जाहीर करण्यात आली. अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेनेकडून उमेदवार देण्यात येणार नाही, अशी चर्चा रंगली. परंतु दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी महेश सावंत यांना माहीममधून उमेदवारी दिली. एका मुलाखतीमध्ये यावरुन अमित ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मातोश्रीवरुन शुभेच्छा मिळाल्या का?, असा प्रश्न विचारण्यात आला. शुभेच्छा मिळाल्या ना, समोरुन उमेदवार जाहीर केला...त्याच मातोश्रीवरुन मोठ्ठ्या शुभेच्छा मिळाल्या, असं म्हणत अमित ठाकरेंनी उपरोधिक टीका केली.
मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष- अमित ठाकरे
माहिम मतदारसंघातील पाणी, चांगले मैदान, स्वच्छ समुद्रकिनारा, कोळी आणि पोलीस बांधवांना हक्काचे घर यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. या सर्व प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. मी जनतेला केंद्रबिंदू मानून काम करणार आहे. कष्टकरी, मजूर, विद्यार्थी, नोकरदार, महिला अशा प्रत्येक घटकांसाठी कार्यरत राहणार असल्याचं अमित ठाकरेंनी सांगितले.