Amit Thackeray vs Sada Sarvankar: माहीम विधानसभा मतदारसंघात (Mahim Vidhan Sabha) तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray), शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अमित ठाकरेंच्या प्रचारार्थ मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रभादेवी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी अमित ठाकरेंनी देखील भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावर सदा सरवणकरांची मुलगी प्रिया सरवणकर-गुरव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


नवीन फ्रेश चेहरा एखाद्या चित्रपटासाठी ठीक आहे- प्रिया सरवणकर


मनसेने आपला एक नवीन पिक्चर रिलीज केला. त्याला पिक्चरच म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी त्या पिक्चरचं प्रमोशन चालू होतं. नवीन फ्रेश चेहरा...अहो काय पिक्चर काढताय का तुम्ही...नवीन फ्रेश चेहरा एखाद्या चित्रपटासाठी ठीक आहे.  ज्या गल्लीत आपण उभे आहोत, त्या गल्लीच्या पाच समस्या ते मांडू शकत नाही, अशी टीका प्रिया सरवणकर-गुरव यांनी केली. एक नेता म्हटलं की त्याला कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व हवं. तुमचं कतृत्व काय?, आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का?, असा सवालही प्रिया सरवणकर यांनी उपस्थित केला.


सदा सरवणकरांनी संघटना कशी वाढवली हे सगळ्यांनी पाहिलं- प्रिया सरवणकर


सदा सरवणकरांनी संघटना कशी वाढवली हे सगळ्यांनी पाहिलं आहे. मला अभिमान आहे त्यांनी शून्यातून आज एक मिल कामगार काय करू शकतो, हे दाखवून दिले. मेहनतीने, जिद्दीने आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज पुन्हा सदा सरवणकर उमेदवार म्हणून उभे आहेत. माझ्या वडिलांचा मी लहाणपणापासून प्रवास बघितला. माझा जन्म जेव्हा झाला, त्यावेळी संप सुरु होता. त्यावेळी माझ्या मुलांना दूध मिळायला हवं, त्यासाठी ते कामाला जात होते, असंही प्रिया सरवणकर यांनी सांगितले. 


मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष- अमित ठाकरे


माहिम मतदारसंघातील पाणी, चांगले मैदान, स्वच्छ समुद्रकिनारा, कोळी आणि पोलीस बांधवांना हक्काचे घर यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. या सर्व प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. मी जनतेला केंद्रबिंदू मानून काम करणार आहे. कष्टकरी, मजूर, विद्यार्थी, नोकरदार, महिला अशा प्रत्येक घटकांसाठी कार्यरत राहणार असल्याचं अमित ठाकरेंनी सांगितले. 




संबंधित बातमी:


Raj Thackeray: भर सभेत फोन, पुढची सभा रद्द; भाषण सुरु असताना मंचावर नेमकं काय घडलं?, राज ठाकरेंनी सर्व सांगितलं, Video