अकोला : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. 400 पार आकडा गाठायचा आहे, अनुप धोत्रे यांना विजयी करायचं आहे, असं म्हणत  यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. अकोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. 


इंडी आघाडीने राममंदिर होऊ दिलं नाही


अमित शाह म्हणाले, अकोल्याच्या भूमीवर सर्वात आधी मी छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गजानन महाराज यांना अभिवादन करतो. आज हनुमान जयंती आहे. आता थोड्या दिवसांपुर्वी अयोध्येत मोदीजींनी राममंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. इंडी आघाडीने आतापर्यंत राममंदिर होऊ दिलं नाही. पाच वर्षात मोदींनी केस जिंकली, भूमिपूजन केलं आणि राममंदिराचं उद्घघाटनही केलं.


70 वर्ष राम मंदिर अडकवलं


अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधताना म्हटलं आहे. 70 वर्ष राम मंदिर अडकवून ठेवलं. राम मंदिर बनू नये, असं इंडिया आघाडीने म्हटलं. पंतप्रधानांची देशभरात विकासाठी कावड यात्रा, विकसित भारतासाठी पंतप्रधानांची कावड यात्रा आहे, असं अमित शाहांनी म्हटलं आहे.


370 कलम हटवलं


महाराष्ट्राने संकल्प करायचा आहे की, प्रत्येक जागेवरून कमळ फुलवायचं आहे.  काश्मीर आपलं आहे की नाही आहे. खरगे म्हणतात राजस्थान आणि महाराष्ट्राचे काश्मिरशी काय देणे-घेणे. मोदींनी 370 हटवून काश्मिरला कायमचा देशाचा हिस्सा बनवलं.


भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमाकांवर येणार


काँग्रेसने भारताची अर्थव्यवस्था 12 व्या क्रमांकावर ठेवली होती. पंतप्रधान मोदींनी भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. पुन्हा पंतप्रधान मोदींना पंतप्रधान करा आपण भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची करू, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.


अमित शाहांच्या सभेआधी सभास्थळी जोरदार पाऊस


अकोल्यातील भाजपच्या सभास्थळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आगमन नियोजित वेळेपेक्षा उशिराने झालं. पावसामुळे अमित शाह यांचं हेलिकॉप्टर पोहोचण्यास उशीर झाला. अमित शाहांच्या सभेआधी सभास्थळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शाहांच्या सभेसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. 


अनुप धोत्रेंच्या प्रचारार्थ अमित शाहांची सभा


भाजप उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारार्थ अमित शाह यांची अकोल्यात जाहीर सभा झाली. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा होत झाली. 21 एप्रिलची योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द झाल्यावर अमित शाहांना मैदानात उतरवत अकोल्यात प्रचारात मुसंडी मारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अमित शाहा यांच्यासह व्यासपीठावर उमेदवार अनुप धोत्रे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भावना गवळी, आमदार अमोल मिटकरी, विभागातील अनेक भाजप आमदारांसह महायुतीतील सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.