नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मालेगाव येथील माजी सैनिक व शेतकऱ्यांनी अजंग येथे उभारलेल्या 538 एकरातील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला त्यांनी भेट दिली. या कार्यक्रमाच्या मंचावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पाहताच अमित शाह यांनी केलेल्या कृतीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


राज्याच्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर ते कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जवळीक वाढत असल्याचे दिसून आले आहे. अलीकडेच शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात छगन भुजबळ गेले होते. मात्र ते अवघ्या दोन तासात शिर्डीतील शिबिरातून माघारी परतले होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली होती. यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. 


अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या


त्यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नाशिक दौऱ्यावर आलेत. अमित शाह यांनी मालेगावच्या अजंग येथे उभारलेल्या 538 एकरातील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला भेट दिली. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या माती परीक्षण केंद्र व अगरबत्ती कारखान्याचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी सहकार परिषदेच्या माध्यमातून अमित शाह यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते. अमित शाह हे या कार्यक्रमाच्या मंचावर दाखल झाल्यावर त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे बघितले. यानंतर अमित शाह यांनी छगन भुजबळ यांना बोलवीत आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ संवाद देखील झाला. अमित शाह यांच्या कृतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Chhagan Bhujbal : पहाटेचा शपथविधी, अजितदादांची मिटिंगला दांडी अन्...शरद पवार रागाने निघून गेले; पहाटेच्या शपथविधीची छगन भुजबळांनी सांगितली रंजक कहाणी!


Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित