मुंबई : सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला पुतळा सोमवारी 26 ऑगस्टला कोसळला. या घटनेमुळं राज्यातील जनतेमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, संजय राऊत हे राजकोट येथे भेट देऊन पाहणी करुन आले आहेत. सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात माफी मागितली आहे. एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी एक समिती नेमली आहे. या मुद्यावर राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना एकनाथ शिंदे यांना चार प्रश्न विचारले आहेत. 


अंबादास दानवे काय म्हणाले?


आम्ही राजकोट किल्ल्यावर गेलो म्हणून मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात एक समिती नेमली. हा विषय महाराष्ट्राच्या आत्म्याशी जोडलेला असल्याने काही विषय मांडतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवरायांप्रती आत्मीयता बाळगून असतील तर यावर उत्तर देतील. 


1. वास्तूविशारद आणि शिल्पकार या दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्या लोकांचे नाव या समितीमध्ये घेतले आहे, त्या लोकांनी कधी साधा मातीचा गणपती तरी हाताने बनवला आहे का? ते पडलेल्या शिल्पाचा अभ्यास करण्यास पात्र आहेत का? 


2. किती उंचीचा पुतळा येथे उभारायचा, याचा शास्त्रीय अभ्यास झाला होता का? खालील बेटाची ताकद जोखून हा पडलेला पुतळा उभा झाला होता का? की कोणाची तरी राजकीय महत्वाकांक्षा म्हणून मनाने उंचीचा आकडा सांगितला गेला? 


3. राजकोटवर आजघडीला उपलब्ध बांधकाम सामुग्री वापरून उभारण्यात आलेली लाल भडक तटबंदी किल्ल्याच्या मूळ अवशेषांचे वाटोळे करून उभारली गेली का? 


4. विद्यमान सदस्यांच्या प्रेमापोटी काही विद्वान माणसे मुद्दाम बाजूला ठेवण्यात आली आहेत का? 


दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा जयदीप आपटे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. मात्र, राजकोट पुतळा प्रकरणात बांधकाम सल्लागार चेतन पाटील वर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. 




इतर बातम्या :


शिवाजी महाराजांचा नवा पुतळा साकारण्याची जबाबदारी या अनुभवी शिल्पकाराला; अजित पवारांचे संकेत, म्हणाले....


राजकोट किल्ला पुतळा प्रकरणी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात; मध्यरात्री कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई!