मुंबई: गेल्या 10 वर्षांमध्ये आमच्या सरकारच्या काळात भारतातील बँकिग व्यवस्थेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. स्वस्त मोबाईल फोन, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स असणारी जनधन खाती या त्रिवेणी संगमाने भारतात कमाल केली आहे. पूर्वी लोक भारतात यायचे तेव्हा येथील सांस्कृतिक विविधता (कल्चरल डायव्हर्सिटी) पाहून थक्क व्हायचे. मात्र, आज जगातील लोक जेव्हा भारतात येतात तेव्हा येथील फिनटेक डायव्हर्सिटी पाहून भारावून जातात, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईतील जिओ सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024'च्या व्यासपीठावरुन बोलत होते.


यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जगभरातून आलेल्या उद्योजकांच्या समोर आपल्या सरकारच्या निर्णयांचा पाढा वाचताना पूर्वीच्या काँग्रेसशासित राजवटीवर टीका केली. त्यांनी म्हटले की, गेल्या 10 वर्षांमध्ये भारतातील फिनटेक क्षेत्रात 31 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. या काळात देशातील फिनटेक स्टार्टअपमध्ये 500 टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय, स्वस्त मोबाईल फोन, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन खात्यांनी भारतात कमाल केली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.


पूर्वी स्वत:ला विद्वान समजणारे लोक संसदेत उभं राहून भारतातील फिनटेक क्रांतीविषयी प्रश्न उपस्थित करायचे. जेव्हा सरस्वती बुद्धी वाटत होती, तेव्हा हेच लोक रस्त्यात पहिले उभे होते. पण हे लोक म्हणायचे की, भारतातील गावांमध्ये बँकेच्या शाखा नाहीत, इंटरनेट नाही, वीज नाही, मग रिचार्जिंग कुठून करणार? अशा परिस्थितीत भारतात फिनटेक क्रांती कशी होणार, असा सवाल हे विद्वान लोक माझ्यासारख्या चहावाल्याला विचारायचे. पण आज बघा, फक्त एका दशकात भारतातील ब्रॉडबँड युजर्सची संख्या 6 कोटीवरुन 94 कोटीपर्यंत पोहोचली आहे. आज देशात क्वचितच अशी व्यक्ती असेल की, जी 18 वर्षांची आहे त्याच्याकडे त्याची डिजिटल ओळख असणारे आधार कार्ड नाही. आजघडीला देशातील 53 कोटी लोकांकडे जनधन खाती आहेत. याचा अर्थ गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही युरोपियन महासंघातील देशांच्या एकत्रित संख्येइतक्या लोकांना बँकिग व्यवस्थेशी जोडले, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.  


जनधन, आधार आणि मोबाईलमुळे भारतात ट्रान्सफॉर्मेशनला गती: पंतप्रधान मोदी


गेल्या 10 वर्षांमध्ये जनधन, आधार मोबाईल या त्रिवेणीने स्थित्यंतराच्या प्रक्रियेला गती दिली आहे. पूर्वीच्या काळी 'कॅश इज किंग' म्हटले जायचे. पण आजघडीला जगातील अर्ध्याहून अधिक रियल टाईम डिजिटल व्यवहार भारतात होतात. संपूर्ण जगात भारताचा युपीआय हे फिनटेकचे मोठे उदाहरण आहे. आज शहरात किंवा गावात कोणताही ऋतू असतो, भारतातील बँकिग सर्व्हिस 24 तास सुरु असते. कोरोनासारख्या संकटकाळातही भारत हा बँकिग व्यवस्था सुरळीत असणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक होता. जनधन बँक खाती हे महिला सबलीकरणाचे माध्यम  झाले आहे. त्यामुळे महिलांना बचत आणि गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध झाला. मुद्रा योजनेच्या माध्यमातून तब्बल 27 ट्रिलियनची कर्जे देण्यात आली, याच्या 70 टक्के लाभार्थी या महिला आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.


आणखी वाचा


मोदींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांची धरपकड, वर्षा गायकवाड संतापल्या, म्हणाल्या, फडणवीस साहेब तुम्ही काय वागताय?