Akola News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अन् प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)... महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे नेते अन राजकीय ध्रुव. वैचारिकदृष्ट्या आणि विचारधारेने पूर्णत: भिन्न असलेले हे दोन नेते अन् पक्ष. मात्र, महाराष्ट्राने अलिकडच्या तीन वर्षांत अशक्य अशा राजकीय आघाड्या आणि मैत्रीचे प्रयोग पाहिले आहेत. यातच गेल्या काही महिन्यांपासून राज्यात चर्चा सुरु आहे ती प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय मैत्रीची. 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या (Shivshakti-Bhimshakti) या नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सर्वात आधी सुरु केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी. अकोल्यातील (Akola) एका पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना मैत्रीची साद घातली आहे. 


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आंबेडकरांच्या प्रस्तावाकडे शिवसेनेने काहीसं दुर्लक्ष केलं आहे. मात्र, जून महिन्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतरही आंबेडकरांनी अनेकदा शिवसेनेला मैत्रीसाठी आवाज दिला होता. पक्षातील एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील ऐतिहासिक फुटीनंतर उद्धव ठाकरेंनीही नवे राजकीय मित्र जोडण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. यातूनच आधी काहीसं दुर्लक्ष केलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या मैत्रीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत खल सुरु झाला आहे. यादरम्यान याअनुषंगाने काही वेळा उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये फोनवरही चर्चा झाल्या आहेत. दोन्ही पक्षांचे नेतेही भेटले आहेत. काल मुंबईत 'प्रबोधनकार डॉट कॉम' वेबसाईटच्या लोकार्पण कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. यावेळी झालेल्या दोन्ही नेत्यांच्या भाषणातून राज्यातील बहुचर्चित 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या नव्या प्रयोगाचे सुतोवाच झाले आहेत. 


याआधी राज्यात 'शिवशक्ती-भिमशक्ती'चे प्रयोग कधी?
राज्यात याआधीही 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या मैत्रीचे राजकीय प्रयोग झाले आहेत. याची सुरुवात 1970 च्या दशकात मुंबई महापालिकेत झाली होती. मुंबई महापालिकेत शिवसेनेने प्रजा समाज समाजवादी पक्षासोबत युती तुटल्यानंतर तेव्हा रिपब्लिकन पक्षाच्या रा.सु.गवई गटासोबत युती केली होती. पुढे पँथर चळवळीतल्या नामदेव ढसाळांनी शिवसेनेसोबत मैत्री केली होती. मात्र, 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या राजकीय प्रयोगाची मोठी चर्चा झाली 2011 मध्ये. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीपासून फारकत घेतलेल्या रामदास आठवलेंनी बाळासाहेब ठाकरेंसोबत जात राज्यात 'शिवशक्ती-भिमशक्ती'चा प्रयोग केला होता. 


उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांच्या संभाव्य 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या प्रयोगाचे राजकीय फायदे


- 2019 मधील लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 42 लाख मते 


- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आंबेडकरांच्या पक्षाला 28 लाख मते 


- आंबेडकर सोबत आल्यास शिवसेनेला दलितांसह आंबेडकरांना मानणारा ओबीसी आणि मायक्रो मायनॉरिटीज समाजातील मतं मिळण्याचा अंदाज 


- सध्या दोन्ही पक्ष अडचणीच्या कालखंडातून जात असल्याने एकमेकांच्या साथीने महाराष्ट्रात नवा राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न 


- दोन्ही पक्षांकडून मतभेद असलेले मुद्दे बाजूला ठेवत मैत्रीची तयारी. 


'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या नव्या प्रयोगाला गुंफणारा भूतकाळातील 'बाबासाहेब आंबेडकर-प्रबोधनकार ठाकरे' मैत्रीचा धागा आहे. त्यातूनच दोघांच्याही नातवांचा आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी महाराष्ट्राला नवा पर्याय देण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीला दूर करणार की सोडणार? महाविकास आघाडीचं काय होणार? आंबेडकरांचं आधीचं बेभरवशाच्या राजकारणावर उद्धव ठाकरे कशी मात करणार यावरच या 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या सिक्वेलचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे.