मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून महायुती व महाविकास आघाडी असाच प्रामुख्याने राजकीय सामना होणार असल्याचे दिसून येते. मात्र, मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही विधानसभा निवडणुकांचे संकेत दिले आहेत. तर, दुसरीकडे प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनीही आगामी निवडणुकांसाठी तिसरी आघाडी बांधण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही नेत्यांची बुधवारी भेट झाली, त्यानंतर पुढील 15 दिवसांत आपण तिसऱ्या आघाडीचा निर्णय जाहीर करू, असे बच्चू कडू यांनी सांगितलं. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तिसऱ्या आघाडीबाबत मोठं भाष्य केलं आहे. त्यामध्ये, तिसऱ्या आघाडीत अजित पवार असतील, असे त्यांनी सूचवलं आहे.

  


विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha Election) जागावाटपामध्ये घासाघीस करुन मत खाण्यासाठी तिसरी आघाडी तयार होईल, सुपारीबाज पक्षाची संघटना मत खाण्यासाठी समोर येईल, असे म्हणत रोहित पवार यांनी तिसऱ्या आघाडीवर स्थापनेपूर्वीच हल्लाबोल केला. दलीत, मुस्लिम हा समाज तिसऱ्या आघाडीच्या मागे जाणार नाही. निवडून येण्यासाठी नाही तर मतं खाण्यासाठी हे पक्ष उभे राहतील, तिसऱ्या आघाडीत अजित पवार (Ajit Pawar), मनसे (MNS) हे पक्ष असतील, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. दिल्लीवरून फर्मान आल असेल तुमचं कुठलं गणित बसत नसेल म्हणून ते तिसरी आघडी करतील. अजित पवार, मनसे हे तिसरी आघाडी निर्माण करतील असं दिसतंय, त्याची सुरुवात आज झाल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. तसेच, वंचितची भूमिका काय आहे, हे पहावं लागेल, असेही आमदार पवार यांनी म्हटलं. 


अजित पवारांच्या माफीवरही भाष्य


बदलापूर, रुग्णालय घोटाळा, भ्रष्टाचार तिथे तुम्हाला माफी मागता येत नाही. आता तुम्ही माफी मागत असाल तर आम्ही नागरिक म्हणून तुमचं स्वागत करतो, असे म्हणत अजित पवारांच्या माफीनाम्यावरुनही रोहित पवार यांनी भाष्य केलं. 


महाविकास आघाडी जागावाटप 


महाविकास आघाडीतील 80 टक्के जागावाटप राज्य लेव्हलला पूर्ण होईल, थोडा विषय असेल तर तो वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. आमच्यात कुरघोड्या कुठेच नाहीत, असे म्हणत महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर त्यांनी भाष्य केलंय. 


रोहित पवारांकडून राणेंनाही केलंय लक्ष्य


शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन होत असलेल्या राजकारणावर बोलताना, बदलापूरला दुर्देवी घटना घडली तेंव्हा आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो तेंव्हा देखील फडणवीस म्हणाले हे राजकारण करतात. त्यांचेच मोठे नेते आणि गावगुंड तमाशा करत असतील तर आम्ही कसे गप्प बसणार, असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी राणेंना लक्ष्य केलं. 


हेही वाचा


गुडन्यूज! सोलापूर ते तिरुपती... विमानतळावरुन लवकरच 'टेक ऑफ'; दिल्तीत उच्चस्तरीय बैठक