यवतमाळ: भाजपकडून काही दिवसांपूर्वी 195 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह पक्षातील बड्या नेत्यांचा समावेश होता. परंतु भाजपच्या या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. भाजपच्या कार्यक्षम मंत्र्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतल्या जाणाऱ्या नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनाही उमेदवारी घोषित करण्यात आली नव्हती. या गोष्टीची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली होती. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुसऱ्यांदा नितीन गडकरी यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये मंगळवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली.
या सभेत उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षात येण्याची साद घातली. त्यांनी म्हटले की, दोन दिवसांपूर्वी मी बोललो होतो, गडकरीजी जर मोदी (PM Modi) उमेदवारी देत नसेल तर आमच्याकडे या. आम्ही उमेदवारी देतो आणि अधिकाराने काम करण्यासाठी मंत्रीपदही देऊ. देशात आमचं सरकार येणार आहे. गडकरीजी का झुकता त्यांच्यासमोर, दाखवा त्यांना महाराष्ट्राचा पाणी काय आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना पुनश्च: आपल्या पक्षात येण्याचे जाहीर आमंत्रण दिले. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी दिलेल्या प्रस्तावावर गडकरी यांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. परंतु, आता दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांनी ऑफर दिल्यानंतर गडकरी काही बोलणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
मोदीजी समोरच्याला किती कोटींचा घोटाळा केलायस विचारुन पक्षात घेतात: उद्धव ठाकरे
या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदीजी समोरच्याला विचारतात की, कितीचा घोटाळा केला आहेस आणि पक्षात घेतात. मोदीजी 5-10 कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना फक्त पक्षात घेतात. तर 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्याला उपमुख्यमंत्री करतात. मग मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीने किती कोटींचा घोटाळा केला असेल, याचा विचार करा. मागे त्यांना कोणी (भावना गवळी) राखी बांधली होती, हे आठवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मोदीजी सत्तेत येईपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो, असे म्हणायचे. पण आता उलट शेतीत लागवडीचा खर्च दुप्पट झाला आहे. एकाही शेतकऱ्याने उत्पन्न दुप्पट झाल्याचे सांगावे. मी त्याचा सत्कार करेन, अशी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.
सीएए कायदा आणून देशात धार्मिक तेढ निर्माण करायची आहे, उद्धव ठाकरेंचा आरोप
मोदी सरकारने देशात आता नागरिकत्त्व सुधारणा कायदा (CAA) आणला आहे. त्यामुळे अन्य देशातील नागरिकांना नागरिकत्त्व मिळणार आहे. त्याबाबत काही आक्षेप नाही. पण मोदी सरकारला सीएए कायद्याचा वापर करुन धर्माधर्मात तेढ निर्माण करायची आहे. लाखो काश्मिरी पंडित घर सोडून गेले. आधी त्यांना काश्मीरमध्ये परत आणा, मग सीएए कायदा आणा. मणिपूरमध्ये हिंदू नाहीत का? पंतप्रधान मोदी समुद्राच्या बुडाशी जातात मग त्यांना मणिपूरला जाता येत नाही का? तुमच्या दहा वर्षांच्या सत्तेनंतरही राज्यात हिंदू जनआक्रोश मोर्चे का काढावे लागत आहेत? , असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. मोदी पूर्वी म्हणायचे की, अच्छे दिन आऐंगे, पण मी म्हणतो, मोदीजी तुमची सत्ता गेल्यावरच देशात अच्छे दिन येतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
आणखी वाचा
भाजप फक्त रामनामाचा जप करतं, त्यांना देशाची पर्वा नाही; देश वाचवणं हाच आपला धर्म: उद्धव ठाकरे