Deputy CM Ajit Pawar visit Shirur Lok Sabha Constituency: पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुणे दौऱ्यावर (Pune News) आहेत. पण, अजित पवारांचा पुणे दौरा (Ajit Pawar Visit to Pune) सध्या चर्चेचा विषय ठरलाय, तो म्हणजे त्यांनी खासदार अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) दिलेल्या आव्हानामुळे. काल पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात थेट दंड थोपटले आणि एकेकाळी अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असं म्हणत अमोल कोल्हेंना थेट आव्हानच दिलं. काल अजित दादांनी आव्हान दिलं आणि आज सकाळीच अजित दादा अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी करण्यासाठी पोहोचले. महत्त्वाचं म्हणजे, अजित पवारांना याबाबत विचारणाही झाली. पण त्यावेळी मात्र ते म्हणाले की, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही, हा दौरा पूर्वनियोजित होता. 


शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंचा पराभव करणारच असं ओपन चॅलेंज अजित पवारांनी दिलं आणि आज त्यांनी अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा केला. अजित पवारांनी पुण्यातील हडपसरमध्ये माजंरी पुलाची पाहणी केली. आपला हा दौरा पूर्वनियोजित होता. अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवारांनी दिली. तसेच, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.


अजित पवार नेमकं अमोल कोल्हेंबाबत काय म्हणाले होते? 


"एका खासदारानं जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं, तर खूप बरं झालं असतं. एक खासदार एक ते दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा, समोरा समोर. आता त्यांचं चाललंय सगळं. पण, त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी, तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशाही गोष्टी त्यांनी येऊन सांगितलेल्या.", असं अजित पवार म्हणाले. 


अमोल कोल्हेंविरोधातील उमेदवार निवडून आणणारच : अजित पवार 


"उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीनं उमेदवारी दिलेली होती. ते वक्ते उत्तम आहेत, वत्कृत्त्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेनं खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं. पण काळजी करू नका, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार, मी आज तुला सांगतो की, निवडून आणून दाखवेल.", असं अजित पवार म्हणाले.