मुंबई : शाळेत आणि कॉलेजला असताना जसे भन्नाट किस्से घडत असतात, तसेच भन्नाट किस्से सर्व क्षेत्रात घडत असतात. मग,ऑफिस असो किंवा कंपनी असो प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही मजेशीर घटना काळाच्या उदरात दडलेल्या असतात. या घटनांना राजकारणीही अपवाद नाहीत, याउलट विधिमंडळातील राजकीय (Political) नेत्यांचे अनेक भन्नाट किस्से या ना त्या माध्यमातून ऐकायला किंवा वाचायला मिळतात. राजकीय नेत्याचं आत्मचरित्र किंवा ज्येष्ठ, वरिष्ठ नेत्यांची भाषणं ऐकल्यास अशा खुमासदार किस्स्यांची मेजवाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळते. नुकतेच विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी मतदान पार पडले असून विधानपरिषदेतील 4 सदस्यांच्या निरोपाच्या कार्यक्रमप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याबद्दलचा भन्नाट किस्सा उलगडा. यावेळी, अजित पवारांनी कपाळाला हात लावला अन् सभागृहात एकच हशा पिकला. 


आमदार सुरेश धस यांनी भाजप, राष्ट्रवादी पुन्हा भाजप असा प्रवास केला आहे. तरुण वयात गावचे सरपंच म्हणूनही ते निवडून आले होते. त्यामुळे, सुरेशरावांना मी इतरांपेक्षा जास्त ओळखतो, हे सुरेशरावही मान्य करतील, असे म्हणत अजित पवारांनी घडलेल्या एका प्रसंगाची आठवण सांगितली. ''एकदा असंच देवगिरी बंगल्यावर ते आईंना घेऊन आले, आणि इतरांनाही घेऊन आले. देवगिरी बंगल्यावर या दोघांसह त्यांनी मला एक परवानगी मागितली. मी म्हटलं मला कसली परवानगी मागतो, तेव्हा सुरेशराव म्हणाले, नाही नाही.. मी आईलाही आणलं आहे. मला त्यांनी परवानगी कसली मागावी? तर दुसरं लग्न करण्याची.. अजित पवारांनी असं म्हणताच सभागृहात हशा पिकला. मी तर कपाळालाच हात मारला, तरीही आईला बाजूलाच बसवलंय आणि म्हणतात. आईपण आहे, आता तुम्ही परवानगी द्या. मग, मी म्हटलं सुरेशराव काय चाललंय काय, असा भन्नाट किस्सा अजित पवारांनी सांगितला. तसेच, कधी कुणाच्या मनात काय येईल हे सांगता येत नाही,'' असेही अजित पवार यांनी म्हटले. 


विधिमंडळात ठाकरे-फडणवीसांची भेट


दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, आजचा पहिला दिवस गाजला तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लिफ्ट भेटीमुळे. त्यातच, मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही उद्धव ठाकरेंचे विशेष स्वागत केले होते. या स्वागताचीही राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. मात्र, आमची भेट ही केवळ योगायोग असल्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिले.  


5.40 ते 6.25 मिनिटांत हा किस्सा तुम्हाला पाहायला मिळेल.