Ajit Pawar: आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चे उद्घाटन पार पाडले. यावेळी 'एबीपी माझा'शी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत की, मुंबईकरांना या मेट्रोची अत्यंत गरज होती. जवळपास 18 स्टेशनची गरज आज पूर्णत्वास गेली आहे. रोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. तिकिटाचे दर देखील किफायतशीर आहे. हे एमएमआरडीने पुढाकार घेऊन केलेलं काम असून यात दुसऱ्या कोणाचाही संबंध नसल्याचे ते म्हणाले आहेत.


अजित पवार म्हणाले, ''एमएमआरडी ज्या कारणामुळे मुंबईत स्थापन केली, त्यामुळे अनेक फ्लायओव्हर झाले अनेक वेगवेगळे रोडची निर्मिती करण्यात आली.'' मेट्रोच्या या उद्घाटन सोहळ्याला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यामुळे भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ''सरकार येत असतात सरकार जात असतात. गेली अडीज वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या कामात स्वतः आदित्य ठाकरे यांनी लक्ष घातलं. एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातलं. काम पूर्णत्वास जाण्यासाठी एमएमआरडीचे आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितलं आम्हाला सर्व नेत्यांचं सहकार्य लाभलं.''  


या प्रश्नाचे उत्तर देणे अजित पवार यांनी टाळले


यावेळी एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी अजित पवार यांना प्रश्न विचारला. ज्यावर ते 'नो कॉमेंट्स' म्हणाले आहेत.   


काय आहे प्रकरण? 


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, ''अजित पवार यांनी केलेला 1200 कोटींचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा सिद्ध झाला आहे. ईडीने या कारखान्याची संपत्ती जप्त केली होती. न्यायालयाने त्याला मान्यता दिली आहे. माझी भारत सरकार आणि ईडीला विनंती आहे की हा कारखाना पुन्हा 27 हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा.'' याबाबतच विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी उत्तर देणं टाळलं आहे.