Mumbai Metro Inauguration: गुढीपाडव्याच्या शुभदिनी आज मुंबईकरांना मोठी भेट मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाल फीत कापून मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चे लोकार्पण केलं आहे. या दोन्ही मार्गाच्या मेट्रो सुरु झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीतून ही त्यांची सुटका होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई आणि आमदार सुनील प्रभू उपस्थित होते. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि पालकमंत्री अस्लम शेख देखील उपस्थित आहे.
दहिसर ते आरे मिल्क कॉलनी मेट्रो मार्गाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो अधिकाऱ्यांकडू मेट्रो संबधित माहिती जाणून घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मेट्रोचं तिकीट खरेदी करत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत सर्व प्रमुख मंत्री मेट्रो प्रवास करण्यासाठी मेट्रोत दाखल झाले आहेत. दहिसर ते डहाणूकरवाडी असा हा प्रवास असणार आहे. या प्रवासानंतर मुख्यमंत्री एमएमआरडी कर्मचाऱ्यांना संबोधित करणार आहे.
मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. यानंतर आता या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे. अद्यापही काही मेट्रो स्थानकावरील कामे अपूर्ण आहेत. ही कामे आणि आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. मुंबई 'मेट्रो 7' च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असून कमाल दर 80 रुपये असणार आहेत.
'मेट्रो 2 अ' हा 18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.
मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.