पुणे : सुप्रिया सुळे (Supriya Sule) आपल्या आईंना कधी भेटायला आल्या ते माहिती नाही, त्यांची आपली भेट झाली नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)  दिली आहे. कुणी कुणाला भेटलं म्हणून बारामतीकर मतदान करत नाहीत, या ठिकाणी विकासाच्या नावावरच मतदान होत असल्याचं सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. 


ही भावकी गावकीची निवडणूक नाही हे पहिल्यापासून सांगतोय असं सांगत अजित पवार म्हणाले की, ही देशाची निवडणूक आहे. केंद्राचा जास्तीत जास्त निधी बारामतीमध्ये आणण्यासाठी ही निवडणूक आहे. 


साहेबांनी तब्येतीची काळजी घ्यावी


शरद पवारांच्या तब्येतील प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, साहेबांनी तब्येतीची काळजी घ्यायला हवी. आता त्यांच्या जवळच्या लोकांना काही वाटायला पाहिजे. त्यांनी साहेबांना सांगायला पाहिजे होतं की उष्णतेमध्ये फिरू नका. 2004 साली अशीच साहेबांची तब्येत बिघडली असताना आम्ही सांगितलं होतं की त्यांनी काळजी घ्यावी. सरसेनापती नाहीत, सैनिकांना लढायचं आहे असं सांगितलं होतं.  त्यावेळी आम्ही प्रचार केला होता. 


सुप्रिया सुळे यांनी घेतली अजित पवारांच्या आईंची भेट


महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान सुरू आहे. मात्र सर्वाधिक नाट्यमय घडामोडी घडल्या त्या बारामती मतदारसंघात. उपमुख्य़मंत्री अजित पवार सकाळी लवकर मतदानासाठी पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि उमेदवार सुनेत्रा पवार होत्या, तसंच मातोश्री आशाताई पवारही होत्या. त्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मतदान केलं. 


बारामतीतली ही अॅक्शन संपली असं वाटत असताना सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या काटेवाड़ीतल्या निवासस्थानी पोहोचल्याआणि प्रचंड खळबळ उडाली. सुनेविरोधात लढणाऱ्या सुप्रिया सुळेंनी, अजित पवारांच्या आई आशा पवारांचे आशीर्वाद घेतले. ही भेट झाली त्यावेळी अजित पवार, सुनेत्रा पवार मात्र घरात उपस्थित नव्हते.


बारामतीमध्ये राडा, दत्ता भरणेंची कार्यकर्त्याला धमकी


इंदापूरचे आमदार आणि अजित पवारांचे विश्वासू दत्तात्रय भरणेंचा शिवीगाळ केलेला व्हिडीओ समोर आलाय. इंदापूरमधील हा व्हिडीओ असून यामध्ये दत्तात्रय भरणे शिवीगाळ करत असल्याचं दिसतंय. आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत वाद झाला आणि त्यांनी त्याला शिवीगाळ केली. दरम्यान या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली त्याची भेटही घेतली आहे. 


निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही. बारामती अॅग्रोचा कुणीही वाचवायला येणार नसल्याचं दत्ता भरणे म्हणत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय. दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत असून बारामती लोकसभा मतदारसंघात ते सुनेत्रा पवांरासाठी प्रचार करत आहेत. 


ही बातमी वाचा: