पुणे : लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. गत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणारे आढळराव पाटील यांनी यंदा अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर देण्यात आली असून आज  उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी, शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील (Adhalrao Patil) हेच विजयी होतील, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. मात्र, त्यांना किती मताधिक्य मिळेल, या प्रश्नावर मी काही ज्योतिषी नाही, असेही त्यांनी परखडपणे सांगितले.


शिरुर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत आहे. गतनिवडणुकीत कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा विरोध करुन दिल्ली गाठली होती. आता, यंदाही दोन्ही उमेदवारांना एकमेकांचे आव्हान आहे. मात्र, गत निवडणुकीत  कोल्हेंच्या पाठिशी असलेले अजित पवार यंदा आढळराव पाटलांचा प्रचार करत आहेत. पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मोठं शक्तीप्रदर्शन करुन रॅली काढण्यात आली. या रॅलीत अजित पवार गॉगल घालून सहभागी झाले होते. यावेळी, त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नावर उत्तर देताना आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   


जाहीरनाम्यावर बोलणे टाळले


शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला शपथनामा जाहीर केला आहे. त्यावरुन, भाजपाने शरद पवारांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. मात्र, याच अनुषंगाने अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, माझा त्या पक्षाची काहीही संबंध नाही, मी तो जाहीरनामा वाचला नाही, वाचल्याशिवाय उत्तर देणार नाही. तसेच, ते विरोधक असल्याने सत्ताधारी पक्षावर आरोप करणारच, ते त्यांचं कामच आहे. पण, देशात मोदी सरकारने अनेक काम केली आहेत. विरोधकच काम, विरोध करणे हेच आहे, असे अजित पवारांनी म्हटले. 


हात जोडून अजित पवारांचे उत्तर


राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्य जयंत पाटल यांनी आमच्या पक्षाचे 8 उमेदवार निवडून येतील, असा दावा केलाय, याबाबत विचारले असता निकाल येऊ द्या, मग समोर येईल किती जागा येतील, असे उत्तर अजित पवारांनी दिले. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. किती मताधिक्याने आढळराव निवडून येतील?, असा प्रश्न अजित पवारांना विचारला होता. त्यावर, एक मिनिट.. मी त्यामधला ज्योतिषी नाही. पण, आमचा उमेदवार निवडून येईल एवढं मला माहिती आहे, असे उत्तर अजित पवारांनी हात जोडून दिले.  



अमोल कोल्हेंचा दावा, भुजबळांची प्रतिक्रिया


शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरुर लोकसभेत छगन भुजबळांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार होते. मात्र, भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिला. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आल्याचा दावा कोल्हेंनी केला. मात्र, कोल्हे यांचा दावा फेटाळत मी नाशिक सोडणार नाही, असे प्रत्त्युतर छगन भुजबळ यांनी दिल आहे.