पुणे: महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या तीन ते चार जागांवर समाधान मानावे लागले, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. शरद पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल 40 आमदारांना आपल्यासोबत आणणाऱ्या अजित पवार यांच्या तोंडाला भाजपने लोकसभा जागावाटप (Loksabha Seat Sharing) करताना पाने पुसल्याची खोचक चर्चा विरोधकांनी सुरु केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या टीकाकारांना रोखठोक प्रत्युत्तर दिले. लोकसभेच्या जागावाटपात आम्हाला केवळ तीन जागा मिळाल्या, असा गैरसमज काहीजणांकडून पसरवला जात आहे. आम्ही जास्त जागांची मागणी केली होती. परंतु, यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) 23 आणि शिंदे गटाचे 18 खासदार निवडून आले आहेत. या सर्व जागांवर आम्हाला पुन्हा उमेदवारी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मर्यादित जागा आल्या, असा बचाव अजित पवार यांच्याकडून करण्यात आला. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांना महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक कमी जागा आल्याविषयी विचारण्यात आले. या टोकदार प्रश्नावर अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे उसळून प्रतिहल्ला करताना म्हटले की, पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत आम्ही मविआच्यावतीने लढलो होतो. तर एकनाथ शिंदे आणि भाजप शिवसेना एकत्र युतीत लढले होते. त्यावेळी भाजपच्या 23 आणि शिवसेनेच्या 18 जागा निवडून आल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, काँग्रेस 1 आणि आम्ही पुरस्कृत केलेल्या नवनीत राणा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून एक जागा जिंकली होती. परंतु, आता काहीजण कारण नसताना राष्ट्रवादी काँग्रेसला जागावाटपात फक्त तीन जागा मिळाल्या, असा गैरसमज पसरवत आहेत. महायुतीत कोणतेही गैरसमज नाहीत. आमच्या मित्रपक्षांची इतकीच भूमिका आहे की, भाजपने 23 जागा जिंकल्या, शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. या जागा त्यांना मिळाव्यात. यावर आता चर्चा करुन मार्ग काढला जाईल. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला जितक्या जागा मिळायला हव्यात त्या मिळण्यासाठी दोन्ही मित्रपक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी एक ट्विट करून अजित पवार यांना डिवचले होते. महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी म्हटले की, एरवी रुबाबदारपणे तिकिटं वाटणाऱ्या हातांना आज तिकिटांसाठी हात पुढं करावे लागत असतील आणि तेही हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटं पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱ्यांचाही हा अवमान आहे. एकेकाळचा त्यांचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख या गोष्टीचं वाटतं की, एक मोठा नेता महाशक्ती कडून हळूहळू संपवला जातोय.. आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला पूर्णपणे डॅमेज करतील, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
आणखी वाचा