मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी  महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर, पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. अजित पवारांनी अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra interim Budget) मांडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. एकनाथ शिंदे हे अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक करत होते. त्यावेळी माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारुन, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक बजेट आहे, असं म्हटल्याचं सांगितलं. त्यावर मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत असताना, अजित पवार हे मध्येच आले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली. 


मी ज्यावेळी त्यांच्या (उद्धव ठाकरेंच्या) सरकारमध्ये होतो, त्यावेळी मी अर्थसंकल्प मांडल्यानंतर फार छान आहे, फार छान आहे म्हणायचे, आता मी इकडे आहे म्हणून म्हणतात, त्याला काय अर्थ आहे, असं अजित पवार म्हणाले. 


यानंतर मग लगेचच बाजूला उभे असलेले देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "उद्धव ठाकरेंनी यापू्र्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं, मला अर्थसंकल्प कळत नाही, त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? 


महायुती सरकारने आज मांडलेलं बजेट म्हणजे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असं आहे. नवीन रस्त्याच्या घोषणा, पहिल्या घोषणाचे काय असा प्रश्न आहे. मराठी भाषा भावनांचा आम्ही उल्लेख केला तोच आहे. पुढच पाठ मागच सपाट, अशी सरकारची अवस्था आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया 


एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक,महिला, शेतकरी,कामगार ,तरुण, ज्येष्ठ, सगळ्यांनाच यामध्ये समावेश केलेला आहे. बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे. पायाभूत सुविधा म्हणजे कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी आहे.


 रस्ते ,ग्रामीण रस्ते,  शहरी रस्ते असतील या सर्वांना प्राधान्य दिलेला आहे. रेल्वेला आपण प्राधान्य दिलंय. रेल्वे मार्गाना प्राधान्य दिलेला आहे. एअरपोर्ट जे आहेत आपले, एयर कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, त्यासाठी आपण तरतूद केली.


आपले पोर्ट आहेत ते डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण प्राधान्य देतोय. कारण कुठल्याही राज्याची पायाभूत सुविधा मध्ये जो जे राज्य पुढे असतात त्याचा विकास आणि प्रगती वेगाने होत असते.  म्हणून पायाभूत सुविधाना देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले आहे.  


 विरोधकांकडे बोलण्याचे मुद्दे नाहीत, निवडणुका आहेत म्हणून बजेट मांडायचं नाही का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. 


Ajit Pawar on Uddhav Thackeray : अजित पवार नेमकं काय म्हणाले?