Uttam Jankar on Ajit Pawar : "मला काही अजून पक्षातून काढून टाकलेले नाही, मीही रोज विचारतोय की मला पक्षातून काढलाय का? मीही संस्थापक सदस्य असल्याने मीच अजित पवार (Ajit Pawar) यांना काढून टाकू शकतो",असे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले आहेत. आज माळशिरस तालुक्यात नुकतेच मनोमिलन झालेले जयसिंह मोहिते पाटील (Jaysinh Mohite Patil) आणि उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यानंतर बोलताना उत्तम जानकर यांनी आपल्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचेवर निशाणा साधला.


राष्ट्रवादी काय कारवाई करणार?


उत्तम जानकर म्हणाले, जर अजित पवारांना शरद पवारांना पक्षातून काढून टाकत असतील, तर मला अजित पवार यांना काढायला अडचण काय? असा सवालही उत्तम जानकर यांनी केला आहे. यापूर्वी मोहिते जानकर मनोमिलन मेळाव्यात बोलताना जानकर यांनी पक्षाध्यक्ष अजित पवार यांना बारामती मधून हरवणार आणि मग पक्षचिन्ह घड्याळ घेऊन परत येणार असे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांचेवर राष्ट्रवादी काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागून राहिले होते. 


अजित पवार यांनाच पक्षातून काढून टाकेन


पक्षाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आज उत्तम जानकर यांनी मला पक्षातून काढायला लागलात तर मी अजित पवार यांनाच पक्षातून काढून टाकेन असा थेट इशारा दिला आहे. या बैठकीला राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे उपस्थित होते. मोहिते पाटील व उत्तम जानकर यांच्या युतीमुळे माळशिरस तालुक्यात मोठा असंतोष असून मोहिते पाटील यांना विरोध करायची भूमिका धनगर समाज बैठकीत झाल्याचे जानकर यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर जानकर म्हणाले, हा विरोध मावळून सर्व कार्यकर्ते व नेते आपल्या सोबत येतील. 


30 वर्षाचे वैर विसरुन मोहिते पाटील यांच्यासोबत युती


माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरले असून उत्तम जानकर यांनी आपले 30 वर्षाचे वैर विसरुन मोहिते पाटील यांच्यासोबत युती केली आहे. लोकसभेला धैर्यशील आणि विधानसभेला उत्तम जानकर असे समीकरण या युतीत ठरले होते. मात्र या मनोमिलन बैठकीत जयसिंह मोहिते पाटील यांनी उघड शब्द न दिल्याने जानकर यांचे कार्यकर्ते आणि जयसिंह मोहिते पाटील यांच्यात भरसभेत शाब्दिक चकमक उडाली होती. आज यानंतर मोहिते पाटील व जानकर यांच्या समर्थकांची एक बैठक माळशिरस येथे घेण्यात आली. याबैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी जानकर याना पाठिंबा देताना अटी घातल्या आहेत. 
     
विधानसभेच्या वेळी उत्तम जानकर याना राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निवडणूक लढवावी लागणार आहे. जर पक्षाकडून काही अडचणी आल्यास जानकर यांनी अपक्ष निवडणूक लढवावी तरच आम्ही पाठिंबा देऊ असे जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. जर उत्तम जानकर यांच्या जातीच्या प्रमाणपत्रात काही अडचणी आल्यास जानकर जो उमेदवार देतील त्याला पाठिंबा देण्यात येईल, असेही जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


UPSC Result : मुलाखतीच्या आधी आईचं निधन, खचली नाही अन् डगमगलीही नाही; इंदापूरची शामल भगत 24 व्या वर्षी बनली कलेक्टर