मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील (Pune) कोंढवा परिसरात 40 एकर जमिनीचा गैरव्यवहार केल्याचे आता उघडकीस आले आहे. त्यावरुन, विरोधक आक्रमक झाले असून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, या व्यवहाराशी माझा दुरान्वये संबंध नाही. 3-4 महिन्यांपूर्वीच मला अशी कुण कुण कानावर आली होती, तेव्हाच मी असलं काहीही केलेलं मला चालणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे, या जमीन व्यवहाराची संपूर्ण माहिती घेऊन बोलेन असेही अजित पवारांनी स्पष्ट केले होते. आता, याप्रकरणी राज्याचे मंत्री तथा महायुतीमधील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe patil) यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
पुणे जमीन प्रकरणात अजित दादांना जेव्हा कुण कुण लागली होती तेव्हाच त्यांनी हे प्रकरण थांबवले असते तर असे झाले नसते. पण, त्यांच्या कामाच्या व्यापात काही निर्णय परस्पर पण होतात, असा खोचक टोलाच राज्याचे मंत्री तथा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. तसेच, आता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, लवकरच सर्व समोर येईल, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, विरोधकांना काही काम उरले नसल्याने फक्त काहीही झाले तरी ते राजीनामा मागत असतात, असे म्हणत विरोधकांच्या मागणीवरुन पलटवार देखील विखे पाटील यांनी केला आहे.
निषेध करावा तेवढा कमीच - विखे पाटील
राजकारणातील प्रगल्भता संपली आहे, वैचारीक लढाई संपली आहे. जीवे मारण्याची सुपारी देण्यापर्यंत हे राजकारण जात असेल तर ही गंभीर बाब आहे, याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपावर दिली. जरांगे पाटील यांनी मला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या, राजकारणाचा स्तर इतका घसरत जाणं गंभीर आहे. जरांगे पाटील यांनी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप पुराव्यासह दिले आहेत. धनंजय मुंडे माझे मित्र आहेत, मात्र यात तथ्य असेल तर चौकशी व्हायलाच हवी, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
अंबादास दानवेंकडून राजीनाम्याची मागणी
पुण्यातील1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली, तसेच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, केवळ 1 लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला होता. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असंही अंबादास दानवेंनी म्हटलं होतं. त्याच, पार्श्वभूमीवकर विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.